राष्ट्रपिता महात्मा गांधींना रंगावलीतून अभिवादन
पुणे : चले जाव… असे म्हणत अहिंसेच्या मार्गाने ब्रिटीशांशी लढा देणा-या महात्मा गांधी यांना भव्य रंगावलीतून अभिवादन करण्यात आले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांनी हातात तिरंगी ध्वज घेत भारतमातेचा जयघोष करीत त्यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले.
निमित्त होते, जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस्, न-हे तर्फे महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त साकारलेल्या भव्य रंगावलीचे. भारतमातेच्या वैभवात भर घालणा-या व्यक्तिंपैकी महात्मा गांधी हे एक होते, त्यामुळे त्यांचे योगदान दर्शविणारी ही रंगावली २० बाय २० फूट आकारामध्ये साकारण्यात आली. जाधवर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष अॅड. शार्दुल जाधवर, सुरेखा जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. रंगावलीकार सुनील सोनटक्के व वैशाली सोनटक्के यांनी अडीच तासांमध्ये ही रंगावली साकारली.
अॅड.शार्दुल जाधवर म्हणाले, महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या मार्गाने लढा देण्याकरिता भारतवासियांना एकत्र केले. क्रांतिचा एक वेगळा मार्ग त्यांनी स्वातंत्र्यप्राप्तीकरिता दिला. त्यामुळे रंगावलीमध्ये तेरा वैभव अमर रहे भारत मॉं… अशा शब्दांत रंगावलीमध्ये त्यांना शब्द मानवंदना देखील देण्यात आली. पुढील दोन दिवस ही रंगावली संस्थेच्या सभागृहात पाहण्यासाठी सर्वांना खुली राहणार आहे.