fbpx

दर्शकांसाठी विचारसरणीपेक्षा कलाकृतीचा दर्जा आणि रंजनमूल्य हे महत्वाचा असते – सतीश आळेकर

पुणे : “ विचारसरणीने कलेची कास धरायची की नाही हा आजचा प्रश्न नाही. पूर्वीपासून विचारसरणीच्या प्रचारासाठी कलेचा वापर देशात परदेशात होत आला आहे. कला ही प्रथम उत्तम कलाकृती असली पाहीजे. विचारसरणी ही तीच्या सौंदर्यातून व्यक्त व्हावी. जशी बर्टोल्ड ब्रेश्त, उत्पल दत्त यांची नाटके. प्रचारकी होता कामा नये. दर्शक हा एखाद्या विचारसरणीमुळे ती कलाकृती पाहतो असे नाही. ती कलाकृती कलात्मक आणि रंजक आहे की नाही हे सर्वमान्य दर्शकाला कळते. कलाकृती चांगली असेल तर लोक त्याला प्रतिसाद देतील, पण त्यातील विचारसरणी त्यांना जवळची वाटेलचं असे नाही. दर्शकांसाठी विचारसरणीपेक्षा कलाकृतीचा दर्जा महत्वाचा ठरतो,’’ असे मत ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर यांनी व्यक्त केले

आळेकर यांना नुकताच नाटक क्षेत्रातील मानाचा असा ‘विष्णुदास भावे पुरस्कार’ जाहीर झाला. यानिमित्ताने श्रमिक पत्रकार संघातर्फे ‘सांस्कृतिक कट्टा’ या ​उपक्रमाअंतर्गत आळेकर यांच्यासोबत मुक्त संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी अध्यक्ष स्वप्नील बापट, उपाध्यक्ष गणेश कोरे हे उपस्थित होते. कार्यक्रमात आळेकर यांनी संगीत नाटक, कलेतील बदलते प्रवाह, कलेच्या माध्यमातून विचारसरणीच्या प्रचाराचा प्रयत्न, एफटीटीआयआय सारख्या संस्थेतील शिक्षणाचे स्वरूप, विद्यार्थी आत्महत्या आणि माध्यमातील नाटक, चित्रपटाच्या दर्जेदार समीक्षणाचा अभाव अशा विविध विषयांवर मनमोकळेपणाने संवाद साधला.    

 यावेळी कलेच्या सादरीकरणाबाबत आळेकर म्हणाले, “ कला ही प्रवाही असते. ती बदलत जाते. नाटक, संगीत मैफल यांचे देखील तसेच असते. नाटक हा समाजाचा आरसा आहे. कालांतराने त्याचे सादरीकरण बदलते. त्यामुळे तेच सादरीकरण त्यात राहत नाही. याचे उदाहरण म्हणजे १८८१ साली संगीत शारदा या नाटकातून ‘मुलीच्या लग्नाचे वय किती असावे?’ यावर चर्चा करण्यात आली. नंतरच्या काळात इतर सामाजिक प्रश्न नाटकाच्या माध्यमातून हाताळले जावू लागले. मात्र काही कालावधीनंतर लेखक, निर्मात्यांना जे सांगायचे त्यासाठी संगीत नाटक पुरेसे नव्हते. त्यामुळे नवीन पर्याय शोधले गेले, पण याचा अर्थ हा नाही की नाट्यसंगीत संपले. तर केवळ नाटकातून संगीताच्या मैफिलीत आले.’’  

 पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या निकालाबाबत आळेकर म्हणाले, “ पुरुषोत्तम करंडक हे एक व्यासपीठ आहे. त्याच्या काही चौकटी असतात. स्पर्धेच्या पारितोषिकाला महत्व आहे, पण केवळ त्यावर अवलंबून राहू नये. यंदा २ वर्षांच्या कालांतराने ही स्पर्धा झाली. याकाळात मुले घरी बसून होती. सर्व काही ऑनलाईन होते. महाविद्यालयात आल्यावर स्पर्धेसाठी मार्गदर्शन करणारे ‘सीनियर्स’ नव्हते, त्यामुळे नाटकाच्या दर्जात काही कमतरता राहण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण या क्षेत्रात काम करू इच्छीणाऱ्या मुलांनी हार मानून नाटक सोडू नये, तर नव्या जोमाने प्रयत्न करावे.’’

पूर्वी माध्यमातून नाटक, चित्रपट यांचे दर्जेदार समीक्षण वाचायला मिळत असत. पण सध्या अशा प्रकारचे समीक्षण लिहिण्यासाठी त्या ताकदीची व्यक्ती आढळत नाही. कला हा जीवन मरणाचा प्रश्न नाही, त्यामुळे त्याच्या परीक्षणाकडे गंभीरपणे पाहिले जात नाही. मराठी पत्रकारांना समीक्षणाचे प्रशिक्षण देणारी संस्था नाही, अशी खंत आळेकर यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच अशा प्रकारची प्रशिक्षण संस्था निर्माण करण्याची गरजा असल्याचेही त्यांनी सांगितले.  

 विद्यार्थी आत्महत्येबाबत बोलताना आळेकर म्हणाले,”विद्यार्थ्यांमध्ये ‘अस्पीरेशन’ पूर्ण न झाल्याने ‘डिप्रेशन’ येणे स्वाभाविक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नेहमी समुपदेशन केले पाहिजे. त्यांच्याशी सातत्याने संवाद साधले पाहिजे. हे शिक्षकाचे काम आहे. शिक्षण घेणाऱ्या मुलांसोबत केवळ विद्यार्थी म्हणून संबंध न ठेवता, त्यांची परिस्थितीदेखील समजून घेणे आवश्यक असते.”

 फिल्म इन्स्टिट्यूट सारखी मोठी संस्था चालविण्यासाठी लागणारी यंत्रणा देण्यात सरकार कमी पडत आहे. तसेच पूर्वी वेगवेगळ्या विचारासरणीचे लोक एकत्र राहत असले, तरी कोणीही आम्हाला “हीच विचारसरणी योग्य, आणि तुम्ही तिच्याकडेच जा” असा आग्रह कोणी धरला नव्हता. त्यावेळी वातावरण अतिशय मोकळे होते. आता तो उदारमतवादीपणा कमी होत आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: