fbpx

स्त्री शक्तीच्या कवितांमधून ‘श्री सप्तश्रृंगी महालक्ष्मीला’ वंदन 

पुणे : अंधाराला दूर सारायला एक पणती पुरी, कोण म्हणते ती अबला नारी, बळ दुर्गेचे तिच्या उरी… अशी स्त्री शक्तीची जाणिव करून देणारी कविता…बेटी बचाव बेटी पढावचा संदेश देणारी नको निदान, नको गर्भपात, नाही दिवा तरी पणतीला देवू हात… ही  कविता आणि  देवीला आवाहन करणारे ‘हसत ये आंबे नाचत ये… ‘ अशा  गीतांमधून आणि कवितांमधून स्त्री शक्तीचा जागर करीत कलाकारांनी श्री सप्तश्रृंगी महालक्ष्मीच्या चरणी सेवा अर्पण केली.
बिबवेवाडीतील हजारे परिवाराच्या श्री सप्तश्रृंगी महालक्ष्मी मंदिरात आयोजित शारदीय नवरात्र महोत्सवात स्त्री शक्ती जागर व आठवणीतल्या कविता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महोत्सवात अनुराधा हजारे, संध्या तारांबळे, उषा चावरे, मिनल हजारे, कै.सितामाई शिवरामपंत करंदीकर भक्त मंडळ यांचे सहकार्य लाभले. यावेळी विजया वेल्हाळ व गीता पाटगावकर यांनी कवितांचे व गीतांचे सादरीकरण केले. चैतन्य सिंदाळकर (पेटी), नेताजी काणेकर (टाळ), दिपक नाईक (तबला) या दृष्टीहीन  कलाकारांनी साथसंगत केली. डॉ. गीता मांढरे यांनी निवेदन केले.
यज्ञदत्त हजारे म्हणाले, मंदिराची स्थापना सना १९८१ साली झाली असून  शारदीय नवरात्र महोत्सवाचे आयोजन कोजागिरी पौर्णिमेपर्यंत केले जाते. महोत्सवा दरम्यान महिला मंडळे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करतात. वादन-गायन, कीर्तन, भजन, कविता, भक्तीगीते याचबरोबर सौंदर्य लहरी पठण, श्रीसुक्त, सप्तशती पाठ, कुंकुमार्चन, घागरी फुंकणे, मुखवटा उभारणे, देवीची दृष्ट काढणे असे विविध पारंपरिक सोहळे देखील केले जातात. त्याचबरोबर मंदिरात विश्व कल्याणासाठी १ कोटी श्रीसुक्त आवर्तन म्हणण्याचा संकल्प केला असून आजपर्यंत ६४ लाख आवर्तने पूर्ण झाली आहेत, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: