fbpx

शाडो पपेट्रीला हवाय लोकाश्रय – गुंडूराजू  

पुणे  : छाया कठपुतळी अर्थात ‘शाडो पपेट्री’ ही कला सुमारे ३,५०० वर्षे जुनी असून, ती बाहुली नाट्य या प्रकारातील विविध कलाप्रकारांचा अंतर्भाव असणारी एक महत्वाची  कला आहे. आजही दक्षिण भारतात अनेक ठिकाणी ही कला सादर केली जाते. मात्र काळाच्या प्रवाहात या कलेला मिळणारा प्रतिसाद कमी होत असून, या कलेला जिवंत ठेवण्यासाठी राजाश्रयापेक्षा लोकाश्रय मिळणे अधिक गरजेचे आहे, असे मत कर्नाटक येथील प्रसिद्ध बाहुली नाट्य कलाकार गुंडूराजू यांनी व्यक्त केले.

ग्योथं इन्स्टिट्यूट मॅक्स म्युलर भवनतर्फे कोथरूड येथील ‘ द बेस ‘ येथे साकारण्यात आलेल्या ‘इनफिनाईट लायब्ररी’ या प्रकल्पाचे उद्घाटन शनिवारी, शनिवारी दुपारी चार वाजता संपन्न झाले. याप्रसंगी गुंडूराजू यांनी छाया कठपुतळी’ च्या माध्यमातून ‘समुद्रमंथन ‘ ही कथा सादर केली. यावेळी मॅक्स म्युलर भवन, दिल्ली’च्या प्रकल्प व्यवस्थापक आरुषी खन्ना, ग्योथं इन्स्टिट्यूट मुंबई’च्या प्रकल्प संचालक अमृता नेमीवंत, ग्योथं इन्स्टिट्यूट पुणे’च्या संचालक मेरीयम ब्रुम्स, अलियांस फ्रॉसेस’च्या संचालक अमेली वेझिल हे उपस्थित होते.

कर्नाटकातील प्रसिद्ध बाहुली नाट्य कलाकार गुंडूराजू यांची ११ वी पिढी ही ‘छाया कठपुतळी’ कला सादर करत आहे. ते स्वतः ९ व्या पिढीतील कलाकार आहेत, त्यांचा मुलगा आणि नातू सुद्धा ही कला सादर करत असून, गुंडूराजू यांनी देशभरात या कलेचे लाखो कार्यक्रम केले आहेत. ३००० हुन अधिक शाडो पपेट चे त्यांनी जतन केले असून केंद्र सरकारच्या आरोग्य विभागासाठी एडस व इतर विषयांवर जनजागृतीचे कार्यक्रम शाडो पपेट्रीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सादर करतात. या कलेविषयी माहिती देताना गुंडूराजू म्हणाले की ही कला सादर करणारे कलाकार आता फारच थोडे उरले आहेत त्यात प्रामुख्याने ओरिसा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि केरळ मधील काही कुटुंबांचा समावेश आहे.

कथाकथनाच्या या प्रकारात अजूनही मोठ्या प्रमाणात पौराणिक कथा सादर केल्या जातात. आजही कर्नाटक राज्यात  ग्रामीण भागातील लग्नकार्यात अगदी रात्रभर ८-१० तास शाडो पपेट्री संबंधी कार्यक्रम रंगतात त्यामुळेच मी आणि माझे कुटुंबीय अगदी मनापासून या कलेचे संवर्धन करत आहोत. या कलेचा उगम महाराष्ट्र राज्यात झाला परंतु ब्रिटीश राजवटीमध्ये याचा उपयोग स्वातंत्र सैनिक जनजागृतीसाठी करत आहेत हे लक्षात आल्यावर यावर बंदी घालण्यात आली, असेही कर्नाटक राज्यातील हसन जिल्हयाचे रहिवासी असलेले गुंडूराजू यांनी आवर्जून सांगितले.

‘इनफिनाईट लायब्ररी’ हा व्हर्च्युअल रिअॅलिटी तंत्रज्ञानावर आधारित एक तात्पुरत्या स्वरूपातील प्रकल्प असून, या ठिकाणी नागरिक व्हर्चुअल रिअलिटी तंत्रज्ञानाद्वारे क्यू आर गेम, होलोग्राम्स, थ्री डी प्रिंटेड ऑबजेक्टस् आणि ऑडीओ- व्हिज्युअल गोष्टी, निसर्गाशी निगडीत विविध विषयांची माहिती घेऊ शकतील. त्याचबरोबर या प्रकल्पातील व्हर्च्युअल रूम’मध्ये दक्षिण भारतीय बाहुलीनाट्य, ‘युरोपियन अल्केमी’ आणि जगभरातील ‘पोलीनेशन नेव्हिगेशन’ यांचा समावेश करण्यात आला आहे. हा प्रकल्प म्हणजे भविष्यकालीन ग्रंथालयाचा एक परिपूर्ण अनुभव आहे.

या प्रकल्पाबाबत बोलताना आरुषी खन्ना म्हणाल्या ,” ‘इनफिनाईट लायब्ररी’ हा एक ‘ट्रॅव्हल सेट अप’ अर्थात प्रवासी किंवा अस्थायी प्रकल्प असून, आतापर्यंत भारतात आणि भारताबाहेर विविध शहरांमध्ये आम्ही हा प्रकल्प सादर केला आहे. यामध्ये दिल्ली, चेन्नई, बेंगलोर, तसेच परदेशातील काही शहरांचा समावेश आहे. यामध्यामातून समकालीन तंत्रज्ञानाचा वापर करत, माहितीची आणखी चांगली देवाणघेवाण व्हावी आणि ज्ञानार्जन प्रक्रियेला  अधिक चालना मिळावी, या उद्देशाने आम्ही हा प्रकल्प सादर करत आहोत. पुढील काळात भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका या देशात आणखी काही ठिकाणी हा प्रकल्प आम्ही सादर करणार आहोत.”

Leave a Reply

%d bloggers like this: