fbpx

पारंपारिक पद्धतीने मिरवणूक काढत बैल पोळा सण उत्साहात साजरा 

  • लम्पी रोगामुळे पहिल्यांदाच मिरवणुकीसाठी फायबरच्या बैलांचा वापर 

पुणे :  वडगाव बुद्रुक परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात पारंपारिक पद्धतीने मिरवणूक काढत भाद्रपदी बैल पोळा सण साजरा केला. यंदा बैल पोळ्यावर प्राण्यामध्ये पसरत असलेल्या लम्पी रोगाचे संकट आले आहे. यामुळे  शेतकऱ्यांनी सरकारच्या आदेशाचे पालन करत मिरवणुकीत सजीव बैलांचा वापर न करता  फायबरच्या बैलांचा वापर करत आपली परंपरा जोपासली आणि  प्राण्यांवर आलेले संकट दूर करण्यासाठी बळीराजाला साकडे घालण्यात आले. फायबरच्या बैलांचे पारंपरिक पद्धतीने पूजन करून त्यांना पुरणपोळीचा नैवद्य दाखवून मिरवणूक सुरू झाली.

प्रगतिशील शेतकरी कांतिराम (अण्णा) जाधव,  यांच्या पुढाकारातून ही पारंपारिक मिरवणूक काढण्यात आली. यावेळी -श्रीमंत दगडूशेट हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष माणिकदादा चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.  युवराज कांतिराम जाधव,चैतन्य कांतिराम जाधव, यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.  बैल पोळ्यानिमित्त काढण्यात आलेल्या या पारंपारिक मिरवणुकीमध्ये वडगाव बुद्रुकवासीयांना पारंपारिक लाकडी खेळ, ढोल लेझिम,लाईव्ह ऑर्केस्ट्रा यासह दांडपट्टा चे चित्तथरारक प्रात्ययक्षिते बघायला मिळाली. मागील ४० वर्षांपासून जाधव नगर, वडगाव बुद्रुक येथे पारंपारिक बैल पोळा सण साजरा होतो, यंदा  प्राण्यांवर लम्पी रोगाचे संकट असले तरी परंपरेत खंड पडू न देता हा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला.

Leave a Reply

%d bloggers like this: