fbpx

भव्य दुर्गा पूजा महोत्सवातून घडणार बंगाली संस्कृतीचे दर्शन

पुणे  : वैशिष्ट्यपूर्ण पोशाख, चवदार खाद्यपदार्थ, संगीत, कला आणि अध्यात्म अशा विविध माध्यामातून बंगाली संस्कृतीने आपली वेगळी छाप उमटवली आहे. पूर्व भारतातील ही  संपन्न संस्कृती अनुभविण्याची अनोखी संधी पुणेकरांना मिळणार आहे. निमित्त आहे, भव्य दुर्गा पूजा महोत्सवाचे      

बंगाली समाज बांधवांचा लोकप्रिय सण असलेल्या दुर्गापूजेचे औचित्य साधत, पुण्यातील त्रिकाया फौंडेशनतर्फे १ ते ५ ऑक्टोबर दरम्यान बाणेर येथील कुंदन गार्डन येथे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बंगाली खाद्यपदार्थ, विविध कलांचे सादरीकरण, फ्ली मार्केट, सेलिब्रिटीजची उपस्थिती आणि विविध सामाजिक उपक्रम हे या महोत्सवाचे वैशिष्ट्य असणार आहे.

त्रिकाया सांस्कृतिक फाउंडेशन ही महिलांनी सुरू केलेली संस्था असून, समाजातील वंचित महिलांना सक्षम आणि उन्नत करण्यासाठी काम करणे हे त्याचे उद्देश आहे. त्याचप्रमाणे समृद्ध बंगाली, भारतीय कला आणि संस्कृतीचे जतन करणे हे त्रिकाया सांस्कृतिक फाउंडेशनचे ध्येय आहे.

या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे २ ऑक्टोबर रोजी कोलकाता येथील प्रसिद्ध गायिका उज्जैनी मुखर्जी यांचे सादरीकरण होणार आहे. त्याचबरोबर १ ऑक्टोबर रोजी दिव्यांग कलाकार जयंती घोष आणि तिचे वडील सब्यासाची घोष यांचे सांगीतिक सादरीकरण होणार आहे. तर ३ ऑक्टोबर रोजी पं. अतुल केसकर यांचे सितारवादन होणार आहे. प्रसिद्ध क्रिएटीव्ह आर्टिस्ट देवश्री चंद्रकार उर्फ शिरी या महोत्सवात कार्यशाळा घेणार आहेत.

महोत्सवादरम्यान विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यामध्ये मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, ‘अल्पोना’ आणि ‘रांगोळी’ स्पर्धा, शंख ध्वनी स्पर्धा, उललू ध्वनी स्पर्धा आणि सर्व पाणीपुरी प्रेमींसाठी ‘जगातील सर्वोत्तम पाणीपुरी खाण्याची स्पर्धा’ यांचा समावेश आहे. याठिकाणी भेट देणाऱ्यांना दुर्गापूजा  उत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रम जसे की धुनुची नृत्य, ढाक-एर ताले दांडिया आणि बांगला बाऊल  आणि रबी नृत्य, तसेच त्रिकाया’च्या सदस्यांनी सादर केलेले बंगालचे पारंपारिक नृत्य प्रकार पाहण्यास मिळतील.

उत्सवादरम्यान फाऊंडेशनतर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत. विहान या दिव्यांग व्यक्तींसाठी चालविण्यात येणाऱ्या केंद्रातर्फे महासप्तमी दिवशी त्यांच्या कार्याचे प्रदर्शन केले जाणार आहे. तर महाअष्टमीनिमित्त वंचित मुलींना आधार देण्यासाठी ‘आवश्यक वस्तूंचे वाटप’ मोहिमेचे नियोजन करण्यात आले आहे. नवमी दिवशी थेरगाव, पिंपरी-चिंचवड येथील वंचित महिला त्यांनी बनवलेल्या वस्तूंचा स्टॉल लावणार आहेत. विविध कला, संस्कृती आणि सामाजिक उपक्रमांनी संपन्न या महोत्सवाला नागरिकांनी आवर्जून भेट द्यावी असे आवाहान त्रिकाया फाऊंडेशनतर्फे करण्यात आले आहे.  

Leave a Reply

%d bloggers like this: