fbpx

आयुष्मान भारत योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

पुणे : आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांवर दर्जेदार व मोफत उपचार करण्यात येत आहे. त्यामुळे या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीसाठी उत्कृष्ट कार्य करणारी रुग्णालये व आरोग्य मित्रांच्या सत्काराप्रसंगी ते बोलत होते. यावेळी औंध जिल्हा रुग्णालयचे डॉ. प्रेमचंद काबळे, महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेचे विभागीय समन्वयक रणजित मोरडे, जिल्हा समन्वयक डॉ. प्रिती लोंखडे, जिल्हा प्रमुख चेतन तिकोणे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, कोविडच्या काळात आरोग्य यंत्रणेसह विविध विभागाच्या अधिकरी व कर्मचाऱ्यांनी महत्वाची भूमिका पार पाडली आहे. आरोग्य विषयक सेवा मिळण्यासाठी ‘आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ व राज्य शासनाची ‘महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना’ या दोन्ही योजना एकत्रित स्वरुपात गेल्या चार वर्षांपासून जिल्ह्यात राबविण्यात आहे. नागरिकांना आरोग्य विषयक सोईसुविधा उत्तमप्रकारे मिळण्यसाठी ही योजना अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहचवावी. योजना अंमबजावणीमध्ये मुंबई प्रथम क्रमांकावर असून पुणे दुसऱ्या क्रमांकावर आहे. पुणे जिल्ह्यात या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करुन राज्यात प्रथम क्रमांकावर येण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्ह्यात १५ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत ‘आयुष्मान भारत पंधरवडा’ साजरा केला जात आहे. यानिमित्ताने जिल्ह्यात विविध रुग्णालयात आरोग्य शिबीरे आयोजित करुन आयुष्मान कार्डचे वितरण करण्यात येणार आहे. याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहनही डॉ. देशमुख यांनी केले आहे.

श्री. मोरडे म्हणाले, लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड (ई-कार्ड) वितरित करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. जिल्ह्यात योजना लागू झाल्यापासून ४ लाख ५७ हजार २८ पात्र कुटुंबातील २ लाख ४१ हजार २२१ नागरिकांना लाभ देण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांमार्फत ५० शाळांमध्ये व्यापक जनजागृतीसाठी करण्यात येत आहे. त्यामध्ये योजनेच्या संकल्पनेवर आधारित रांगोळी स्पर्धा, चित्रकला, पोस्टर रंगविणे, निबंध, घोषवाक्य असे विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. विविध रुग्णालयात १३ आरोग्य शिबीरे आयोजित करण्यात आली आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते या योजनेच्या अंमलबजावणीसाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ससून सर्वोपचार रुग्णालय, यशवंतराव चव्हाण रुग्णालय पिंपरी, सूर्या सह्याद्री रुग्णालय कसबा पेठ, तसेच ससून हॉस्पिटलचे आरोग्य मित्र ममता उबाळे आणि पुणे कटक मंडळ येथील सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाचे आरोग्य मित्र उत्कर्ष लांडगे यांचा सन्मान करण्यात आला.

Leave a Reply

%d bloggers like this: