मराठवाडा भूषण युवा गौरव पुरस्कार उद्योजक संतोष खवळे यांना प्रदान
पुणे : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त दिला जाणारा मराठवाडा युवा गौरव पुरस्कार पुण्यातील उद्योजक संतोष खवळे यांना पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मराठवाड्यामध्ये जन्म घेऊन कृषी, शैक्षणिक, औद्योगीक, सामाजिक, राजकीय अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना मराठवाडा भूषण पुरस्काराने सन्मानित केले जाते. याच अनुषंगाने धेनू टेक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक संतोष खवळे यांना पशुपालन व दुग्धव्यवसाय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मराठवाडा भूषण युवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
संतोष खवळे विविध संस्थाच्या सल्लागार समित्यावर तसेच मेंटर म्हणून ते काम करतात. भारत सरकार तसेच जर्मन सरकार यांच्या उद्योजकता विषयावरील उपक्रमात त्यांनी जूरी पॅनल मेंबर तसेच selection committee मेंबर म्हणूनही पद भूषविले आहे. स्टार्टअप, डिझाईन आणि इनोवेशन या विषयावरील विविध उपक्रम त्यांच्या कंपनीद्वारे चालवले जातात.
त्याशिवाय श्री. संतोष खवळे यांच्याबद्दल उल्लेखनीय बाब अशी की ते मराठी कवि आहेत. त्यांच्या कविता विविध मासिके, वर्तमानपत्रे तसेच पुस्तकातून छापून आल्या आहेत. त्यांच्या कविताना विविध संमेलनातून राज्यस्तरीय तसेच इतरही अनेक पुरस्कार मिळाले आहेत. कविता मला जगण्याचे बळ देते, हे ते नेहमी आवर्जून सांगतात. विविध समाजउपयोगी कार्यातही ते सतत त्यांचे योगदान देत असतात.
उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पिंपरी चिंचवडमधील व्यक्तींना मराठवाडा भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. यामध्ये प्राचार्य डॉ. मनोहर पाटील (शैक्षणिक पुरस्कार), बाळासाहेब साळुंखे (गुणवंत कामगार पुरस्कार), जगन्नाथ माने (दुर्गरत्न पुरस्कार), खंडूदेव पठारे (सामाजिक पुरस्कार), दयानंद पोटे (उद्योग पुरस्कार), विकास वीर (युवा गौरव पुरस्कार, मुक्ताताई चिंचोरे (उद्योग पुरस्कार), विजय वडमारे (युवा गौरव पुरस्कार) आदींचा समावेश आहे. डॉ. गजानन व्हावळ यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाची यशोगाथा सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहित्यिक किरण गहेरवार यांनी, तर आभार सूर्यकांत कुरुलकर यांनी मानले.