fbpx

भारतीय संस्कृतीचा अत्यंत जाज्वल्य इतिहास – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन

पुणे :भारतीय संस्कृतीत विविधता आहे, आपला इतिहास अत्यंत जाज्वल्य आहे. जर आपल्याला भारत समजून घ्यायचा असेल, तर भारतातील प्राचीन संस्कृती, इतिहास, वैदीक परंपरा, संगीत, आयुर्वेद या क्षेत्रांतील एकसूत्रता समजून घेणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी व्यक्त केले.
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्थेच्या वतीने आज पुण्यात झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या हस्ते, “भारत विद्या” या ऑनलाइन शैक्षणिक पोर्टलचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष ॲड. सदानंद फडके, कार्याध्यक्ष भूपाल पटवर्धन, कोषाध्यक्ष संजय पवार, विश्‍वस्त व माजी खासदार प्रदीप रावत व्यासपीठावर उपस्थित होते. संस्थेच्या वतीने, भागवतपुराणाची प्राचीन हस्तलिखित प्रत देऊन केंद्रीयमंत्री निर्मला सितारामन यांचा सत्कार करण्यात आला. तसेच भारत विद्या पोर्टल तयार करण्यात विशेष योगदान देणाऱ्या डॉ.गौरी मोघे, चिन्मय भंडारी आणि अन्य तरुण सहकार्यांचा सत्कार निर्मला सितारामन यांच्या हस्ते करण्यात आला.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन म्हणाल्या, भारताच्या प्राचीन संस्कृतीचा धर्म हा पाया आहे. धर्म हीच भारताची प्रतिमा आहे.केंद्र सरकारने देखील आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतही भारतीय तत्वज्ञानाचा अंतर्भाव प्रामुख्याने केला आहे. पुणे आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्थेबद्दल मला विशेष आदर आहे. कारण पुणे येथे बौद्धिक संपदेला विशेष प्राधान्य देण्यात येते. आधुनिक युगाच्या २१ व्या शतकात भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्थेने, भारतीय संस्कृती जपत,संवर्धनाचे कार्य अत्यंत मौलिक आहे. विशेषतः महाभारतावर केलेले चिकित्सात्मक संशोधनाबद्दल अभिमान वाटतो.
विष्णूपुराण, महाभारताच्या चिकित्सात्मक आवृत्तींचे भांडारकर संस्थेतील संशोधन निश्‍चित गौरवास्पद आहे. असा उल्लेख करून त्या म्हणाल्या, सध्याचे युग डिजिटल मिडियाचे आहे. त्यामुळेच तरुण संशोधकांनी भारत विद्या पोर्टलसाठी केलेल्या कार्याबद्दलही त्यांनी शुभेच्छा दिल्या. भारतीय साहित्य ही मौलिक संपत्ती आहे. त्यामुळेच भारतीय अभियंते देखील आता संस्कृत भाषा शिकण्यास प्राधान्य देऊ लागले असल्याची ही विशेष उल्लेखनीय बाब आहे.असेही निर्मला सितारामन म्हणाल्या.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, ऐतिहासिक विषयांत संशोधन करून लोकांसमोर तत्कालिन ऐतिहासिक वास्तवता आणण्याचे कार्य भांडारकर संस्था करत आहे. इ.स.२००० पूर्वी लिहिलेला इतिहास हा खरा होता की खोटा होता. याबाबत चिकित्सा होत असे. मात्र,आता संशोधनामुळे सत्य समोर येण्यास मदत होत आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार लवकरच महाराष्ट्र सरकार दोन नवीन शैक्षणिक करार करणार आहे. भांडारकर संस्थेने देखील पुणे विद्यापीठाशी संलग्नित काही ऑनलाइन कोर्सेस सुरू केल्यास विद्यार्थ्यांचे क्रेडीट पॉंईट वाढतील. ३१ डिसेंबरपर्यंत पॉलिटेक्निक आणि अभियांत्रिकीचे अभ्यासक्रम मराठी भाषेत सुरू करण्याबाबत राज्य सरकारने पाऊले उचलली आहेत.
कार्यक्रमप्रसंगी भूपाल पटवर्धन यांनी संस्थेच्या कार्यासंबंधीची माहिती दिली. माजी खासदार प्रदीप रावत यांनीही मनोगत व्यक्त केले. ॲड.सदानंद फडके यांनी आभार मानले तर मृणाल धोंगडे यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: