Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

तृतीयपंथी या विषयावर माध्यामांमधील भाषा व चित्रण अधिक संवेदशीलतेने होणे गरजेचे

पुणे: आजही अनेक माध्यमांमधून तृतीयपंथी किंवा पारलिंगी व्यक्ती यांचे चित्रण हे नकारात्मक पद्धतीने होते, ते अधिक संवेदनशील पद्धतीने व्हायला हवे असे मत दिशा पिंकी शेख यांनी व्यक्त केले.

मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने तृतीयपंथीयांचा लोकशाहीतील सहभाग या दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात ‘ आपल्या पाल्याचे तृतीपंथीयत्व स्वीकारलेल्या पालकांशी संवाद’ या विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी रमेश व सुरेखा शिंदे, कालुबाई पाडवी, माधुरी घोगरे आदी पालकांशी संवाद साधण्यात आला. यावेळी तृतीयपंथी व्यक्तीचे पालक म्हणून जगताना भावनांची गुंतागुंत, अनुभव आणि स्वीकार याबाबत चर्चा करण्यात आली. तर दुसऱ्या सत्रात तृतीपंथीयांचे चित्रण आणि स्थान: भाषा, साहित्य, पत्रकारिता आणि चित्रपट या विषयावर चर्चा करण्यात आली. या सत्रसाठी साहित्यिक डॉ. राजन गवस, दिशा पिंकी शेख, डॉ संतोष पाठारे, अलका धुपकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शेख म्हणाल्या, जेव्हा एखाद्या पुरुषाकडून झालेल्या चोरीची बातमी पत्रकारांकडून लिहिली जाते तेव्हा अमुक व्यक्तीने चोरी केली असा उल्लेख असतो पण तीच चोरी जर तृतीयपंथी व्यक्तीने केली तर तृतीयपंथी व्यक्तीकडून चोरी असा मथळा दिला जातो. तर हा सूक्ष्म पण दीर्घकाळ परिणाम करणारा बदल आपण करणे गरजेचे आहे.

आजही अनेक चित्रपटांमध्ये तृतीयपंथी व्यक्ती पैसे मागताना किंवा नकारात्मक भूमिका साकारताना दाखवली जाते, हे चित्र बदलायला हवे असही सूर या चर्चेतून उमटला.

यावेळी राजन गवस म्हणाले, आपल्या समाजव्यवस्थेतून तृतीयपंथी व्यक्तींना मिळणारी वागणूक ही बदलायला हवी. तर अलका धूपकर म्हणाल्या, तृतीयपंथीयांना हिणवण्यासाठी वापरले जाणाऱ्या शब्दांवर बंदी घालायला हवी.

पहिल्या सत्रात संवादक म्हणून डॉ.साधना नातू तर दुसऱ्या सत्राचे संवादक म्हणून श्रीरंजन आवटे यांनी काम पाहिले. सर्व मान्यवरांचा सत्कार मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र श्रीकांत देशपांडे यांनी केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading