सर्व पक्षांनी पंतप्रधानांना भेटून वेदांत प्रकल्प परत आणावा -खासदार सुप्रिया सुळे
पुणे : वेदान्तचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्यानंतर राज्यातील राजकारण आता तापू लागले आहे. या विरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पुण्यात लॉलिपॉप हातात घेऊन आंदोलन करण्यात आले. त्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व खासदार सुप्रिया सुळे सहभागी झाल्या होत्या. तेव्हा सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमाची संवाद साधला.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मुख्यमंत्र्यांनी गंभीर व्हावं. राज्य आणि देशासमोर बेरोजगारीचं मोठं आव्हान आहे. त्यामुळे हलगर्जीपणा करून चालणार नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी. राज्याच्या हितासाठी एकत्र यावं. सर्व पक्षीय प्रतिनिधींचं शिष्टमंडळ दिल्लीत न्यावं. पंतप्रधानांना भेटून आपला प्रकल्प परत आणावा . अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.
तसेच राज्यातील अडीच ते तीन लाख रोजगाराचा प्रश्न आहे. त्यावर गांभीर्य व्हायला हवं. तळेगावला साईट पाहिली होती. सर्व तयारी झाली होती. मग अचानक काय झालं? प्रकल्प गुजरातला गेला. त्याची जबाबदारी घ्या. सत्तेत बसणं म्हणजे नुसतच सत्कार घेणं. लाल दिवा बंद करून लोकांची गैरसोय करणं आणि गाड्यांचा सुसाट धावणारा ताफा नसतो. सर्वसामान्य लोकांची सेवा करण्याची संधी यालाच सत्ता म्हणतात असा टोला मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.
महाराष्ट्राला मेरीटवर जो प्रोजेक्ट मिळाला होता, तो गुजरातमध्ये नेण्यात आला, ही अत्यंत दुर्देवी बाब आहे. वेदान्तच्या जागी दुसरा प्रकल्प आम्ही महाराष्ट्राला देऊ असं म्हणणं बालिशपणा आहे. मुख्यमंत्र्यांनीही हे विषय जरा गांभीर्याने घेतले पाहिजे. हा छोटा विषय नाही. राज्यातल्या अडीच ते तीन लाख युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न आहे. अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर केली आहे.
तळेगावला या प्रकल्पासाठी जागा निश्चित केली असताना, हा प्रकल्प गुजरातला का गेला? याचं उत्तरं राज्य सरकारने द्यायला हवं. तुम्ही सत्तेत आहात, त्यामुळे याची जबाबदारी तुम्ही घ्यायला हवी. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे राज्याचे पालक आहेत. त्यांनीच आपल्या मुलांवर अन्याय करावा. असा प्रकार आहे .असेही त्या म्हणाल्या.
