एयर इंडियाच्या परिवर्तनासाठी योजना जाहीर – विहान.एआय
नवी दिल्ली : एयर इंडियाने आज आपल्या परिवर्तनाची सर्वसमावेशक योजना जाहीर केली असून त्याअंतर्गंत कंपनीने परत एकदा भारतीय मूल्ये जपणाऱ्या जागतिक दर्जाच्या विमानवाहतूक कंपनीचे स्थान मिळवण्याचे ध्येय ठेवले आहे. ग्राहक सेवेपासून तंत्रज्ञानापर्यंत आणि विश्वासार्हतेपासून पाहुणचारापर्यंत सर्वच पैलूंवर सर्वोत्तम बनण्याचे उद्दिष्ट कंपनीने आखले आहे. ‘विहान. एआय’ असे संस्कृत नाव आणि ‘नवी पहाट’ असा साजेसा अर्थ असलेल्या या योजनेअंतर्गत एयर इंडियाने पुढील पाच वर्षांसाठीची उद्दिष्टे तयार केली आहेत.
विहान.एआयचा एक भाग म्हणून एयर इंडियाने स्पष्ट उद्दिष्टांचा समावेश असलेली तपशीलवार योजना तयार केली असून त्यामध्ये प्रामुख्याने नेटवर्क आणि ताफा विस्तारणे, ग्राहक सेवेचा पूर्णपणे नवा अनुभव तयार करणे, विश्वासार्हता व वेळेची कामगिरी उंचावणे, तंत्रज्ञानाच्या बाबतीत आघाडी घेणे, शाश्वतता आणि नाविन्य यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून त्यासाठी सर्वोत्तम गुणवत्तेची नेमणूक करण्यासाठी आवश्यक गुंतवणूकही केली जाणार आहे. पुढील ५ वर्षांत एयर इंडियाने देशांतर्गत बाजारपेठेतील आपला हिस्सा किमान ३० टक्क्यांनी वाढवण्याचे ठरवले असून आंतरराष्ट्रीय मार्गही सध्याच्या बाजारपेठ हिश्श्यापासून उंचावले जाणार आहेत. ही योजना एयर इंडियाला विकास, नफा आणि बाजारपेठेत आघाडीते स्थान मिळवण्यासाठी आखण्यात आली आहे.
एयरलाइनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कॅम्पबेल विल्सन आणि त्यांचे वरिष्ठ व्यवस्थापन सदस्य परिवर्तनाची ही योजना यशस्वी करण्यासाठी एकत्रितपणे काम करत असून त्यांनी विहान. एआय योजना संपूर्ण कंपनी, व्हर्च्युअल संवाद आणि संवादी व्यासपीठांच्या माध्यमातून जाहीर केली. आगामी काही दिवस आणि आठवड्यांत व्यवस्थापन टीम विविध प्रदेश आणि विभागांतील कर्मचाऱ्यांशी प्रत्यक्ष आणि हायब्रीड सेशन्सद्वारे संवाद साधणार आहे.
एयर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या महत्त्वाकांक्षा आणि कंपनीच्या विकासासंदर्भातील विचार लक्षात घेऊन विहान.एआय तयार करण्यात आली आहे. विहान.एआयमध्ये पाच प्रमुख स्तंभावर लक्ष केंद्रित करण्यात आले असून त्यात नाविन्यपूर्ण ग्राहकानुभव, दमदार कामकाज, या क्षेत्रातील सर्वोत्तम गुणवत्ता, उद्योगक्षेत्रात आघाडीचे स्थान, व्यावसायिक कार्यक्षमता आणि नफा कमावण्याची क्षमता यांचा समावेश आहे. कंपनीतर्फे मूलभूत गोष्टींना प्राधान्य दिले जाणार असून त्याचबरोबर विकासासाठी तयार केले जाणार आहे. मध्यम ते दीर्घ काळात कंपनीचा भर गुणवत्ता उभारण्यावर आणि जागतिक पातळीवर आघाडीचे स्थान मिळवण्यावर (टेक ऑफ आणि क्लाइम्ब टप्पा) असेल.
९० वर्षांपूर्वी एक महिन्यापूर्वी तरुण जेआरडी टाटा यांनी एयरलाइनच्या पहिल्या उड्डाणाचे वैमानिक म्हणून कामगिरी बजावली होती. ही कंपनी पुढे एयर इंडिया बनली. तेव्हापासून एयर इंडिया आणि तिच्या कर्मचाऱ्यांनी कंपनीचा परत एकदा टाटा समूहात समावेश होईपर्यंत विविध आव्हानांना तोंड दिले. विहान.एआय हा एयर इंडियाचे जागतिक स्तरावरील स्थान परत मिळवून देत कंपनीला सर्वोत्तम डिजिटल भारतीय विमान कंपनी बनवण्यासाठी आखण्यात आलेली योजना आहे.
एयर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कॅम्पबेल विल्सन विहान. एआयविषयी म्हणाले, ‘ही एयर इंडियाच्या ऐतिहासिक परिवर्तनाची आणि एका नव्या काळाची सुरुवात आहे. आम्ही एका नव्या, धाडसी एयर इंडियाची उभारणी करत असून तिची वेगळी उद्दिष्टे आहेत. विहान.एआय ही आमच्या परिवर्तनाची योजना एयर इंडियाला तिचे एकेकाळचे जागतिक स्थान परत मिळवून देण्यासाठी तयार करण्यात आली आहे. आम्ही जागतिक दर्जाची विमानवाहतूक कंपनी उभारण्यावर आणि जागतिक ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देणाऱ्या भारतीय कंपनीचे स्थान मिळवून देण्यावर आम्ही पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे.’
‘परिवर्तनाची प्रक्रिया सुरू झालेली आहे – केबिन्सचे नूतनीकरण, सर्व्हिसेबल सीट्स, विमानातील मनोरंजन अशा गोष्टींवर काम सुरू झाले आहे. त्याशिवाय आम्ही देखभाल व्यवस्था तसेच वेळेच्या बाबतीत कामगिरी सुधारण्यासाठी विमानांच्या वेळापत्रकावर काम सुरू केले आहे. आमच्या विमानताफ्याच्या विस्तारात अरूंद व रूंद अशा दोन्ही प्रकारच्या विमानांचा समावेश असेल. विहान.एआयवर काम करण्यासाठी संपूर्ण कंपनी आणि भागधारक उत्सुक असून एयर इंडियाचे नवे रूप उदयाला आल्यानंतर हे बदल सर्वांना ठळकपणे दिसतील,’ असे विल्सन म्हणाले.
