नृत्य संरचनेचा विद्यापीठ पातळीवरील अभ्यासक्रम भारती विद्यापीठात
पुणे : भारतीय अभिजात नृत्य शैली या शतकानुशतकं मंदिरात वाढल्या. स्वातंत्र्योत्तर काळात या शैलींचा रंगमंचीय आविष्काराच्या दृष्टीने खूपच विकास झाला. आजच्या काळात शास्त्रीयच नव्हे तर लोकनृत्य, आधुनिक नृत्य, बॉलिवूड नृत्य यामध्ये नृत्य संरचनेला प्रचंड मागणी आहे. हे लक्षात घेऊन भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस् या महाविद्यालयात नृत्य संरचनेचा एक वर्षाचा पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. नृत्य संरचनेचे अध्यापन विद्यापीठ पातळीवर करणारा महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील हा एकमेव अभ्यासक्रम आहे. अशी माहिती भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या स्कूल आॅफ परफाॅर्मिंग आर्टसचे संचालक प्रा. शारंगधर साठे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी स्कूल आॅफ परफाॅर्मिंग आर्टसच्या नृत्य विभाग प्रमुख डाॅ. देविका बोरठाकूर, भक्ती नाईक उपस्थित होते. संचालक प्रा. शारंगधर साठे यांच्या संकल्पनेतून या अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.
प्रा. शारंगधर साठे म्हणाले, कोरिओग्राफी या विषयाची व्याप्ती लक्षात घेता विदेशी विद्यापीठातील नृत्य विभागाशी संलग्नता मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मॉस्को, रशिया येथील कॉबझन्स विद्यापीठाशी संलग्नता मिळाली देखील आहे. नृत्य संरचना पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याना याचा नक्कीच फायदा होणार आहे.
डाॅ. देविका बोरठाकूर म्हणाल्या , १५ वर्षांच्या या काळात नृत्य संरचना हा विषय किती विस्तृत, खोल आणि उपयोगी आहे हे प्रा. साठेंना जाणवले, व या पदविका अभ्यासक्रमाची सुरूवात झाली. एकल नृत्य व समूह नृत्य यामधला फरक, त्यांचा प्रभाव, त्यासाठी लागणारं कसब हे सर्व अभ्यासण महत्वाचे आहे. समूह नृत्यातील उर्जा, वेशभूषा, आशयाची मांडणी हे सारे अत्यंत महत्वाचे असते. अभ्यासक्रमात शास्त्रीय, लोककला, समकालीन (वेस्टर्न), बॉलीवूड आदी प्रकारांचा समावेश आहे.
नृत्य संरचना अभ्यासक्रासाठी प्रवेश अर्ज spa.bharatividyapeeth.edu या वेबसाईटवर उपलब्ध असून अधिक माहितीसाठी 02025421032 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.
—
