Saturday, June 20, 2026
Latest NewsPUNE

लतादीदींच्या गाण्याचा तो प्रत्यक्ष थरार कधीच विसरू शकणार नाही

 चित्रपट अभ्यासक  सुलभा तेरणीकर यांनी सांगितल्या आठवणी 

पुणे : सुनियो जी अरज म्हारी ओ बाबुला हमर… या गाण्याच्या रेकाॅर्डिंगला लतादीदींनी पुण्यातील काही लोकांना बोलावले होते आणि त्यातील एक भाग्यवान मी होते. लतादीदींचे ते गाणे ऐकताना  त्यांच्या आवाजाचा प्रत्यक्ष थरार मी अनुभवला आणि त्यावेळेला आपले आयुष्य आता थांबले तरी चालेल असे वाटले. त्यांच्या आवाजातील ती जादू प्रत्यक्ष अनुभविण्याचे भाग्य मला मिळाले. रेकाॅर्डिंग झाल्यानंतर स्वतःचेच गाणे अत्यंत नम्रपणे ऐकणाऱ्या  लतादीदींनी  मी कधी विसरू शकणार नाही, अशी आठवण  भारतीय चित्रपटांच्या अभ्यासक सुलभा तेरणीकर यांनी सांगितली.

पूना गेस्ट हाऊस स्नेहमंचच्यावतीने गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या गाण्यांवर आधारित  ‘ मै नही तो क्या…’ या कार्यक्रमाचे आयोजन लक्ष्मी रस्त्यावरील पूना गेस्ट हाऊस येथे करण्यात आले. यावेळी डॉ. सुनिल देवधर, डॉ. गौरी दामले, लायन शरदचंद्र पाटणकर, दत्ता सागरे, आनंद सराफ, जोत्स्ना सरदेशपांडे, डॉ. सतीश देसाई,संजय मरळ, प्रकाश भोंडे आणि सदानंद लोणकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन किशोर सरपोतदार व मुख्य  समन्वयक अजित कुमठेकर यांनी केले.

कार्यक्रमात गायिका मनिषा निश्चल यांनी लता मंगेशकर यांच्या हिंदी-मराठी गाण्यांचे सादरीकरण केले. प्रसन्न बाम (संवादिनी), अमिक पुंडे (तबला) यांनी साथसंगत केली.

सुलभा तेरणीकर म्हणाल्या, सन १९४२ च्या मार्च महिन्यात पुण्यात सरस्वती सिनेटोनच्या ‘किती हसाल’साठी लतादीदींना गायला बोलावले होते. दिग्दर्शक वसंत जोगळेकर लिहितात, ‘एक कृश, सावळी मुलगी होती; पण तिच्या चेहऱ्यावरचं हसू आणि कमालीचे तेजस्वी पाणीदार डोळे लक्षवेधी होते.’ या घटना म्हणजे आपल्यासाठी लतादीदींच्या आठवणींचा खजिनाच आहे, असेही त्यांनी सांगितले.

मनिषा निश्चल यांनी चलते चलते, यूँही कोई मिल गया था…मन डोले मेरा तन डोले… ओ सजना बरखा बहार आयी… कभी कभी मेरे दिल मे… मेरे नैना सावन भादो फिर भी मेरा मन प्यासा… निळ्या आभाळी, कातरवेळी  अशा हिंदी-मराठी गीतांच्या सादरीकरणाने लता दिंदीच्या आठवणींना उजाळा दिला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading