बजाज आलीयान्झ,पुणे तर्फे २७ नोव्हेंबर रोजी तिसऱ्या हाफ मॅरेथॉन’चे आयोजन
पुणे : बजाज आलीयान्झ’तर्फे दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर पुण्यात हाफ मॅरेथॉन’चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार, २७ नोव्हेंबर रोजी बालेवाडी येथील क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या मार्गाचे अनावरण सोमवारी, दि. १२ सप्टेंबर रोजी पी वाय सी डेक्कन हिंदू जिमखाना येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आले.
ही स्पर्धा प्रामुख्याने चार प्रकारांत आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये २१.१ किमीची हाफ मॅरेथॉन, १० किमी धावण्याची स्पर्धा, ५ किमी धावण्याची स्पर्धा आणि ३ किमी धावण्याची स्पर्धा यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी धावण्याची स्पर्धा, ‘कॉर्पोरेट चालेंज’ आणि सहकुटुंब धावण्याची स्पर्धा हे यंदाच्या स्पर्धेचे वैशिष्ट्य असणार आहे.
तीन किमी’च्या स्पर्धेव्यतिरिक्त इतर सर्व स्पर्धा या ठराविक कालावधीत पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे, अशी माहिती स्पर्धेचे मुख्य संयोजक आणि फिटपेज’चे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास सिंग यांनी दिली आहे.
सर्व स्पर्धांची सुरवात ही बालेवाडी क्रीडा संकुल येथून होणार आहे. हाफ मॅरेथॉन स्पर्धेस मुख्य क्रीडा संकुल येथून सुरवात होईल, त्यानंतर बाणेर बालेवाडी रस्ता, औंध -बाणेर जोड रस्ता, नागरस रस्ता, डी पी रस्ता, विद्यापीठ रस्ता आणि पुन्हा त्याचमार्गे बालेवाडी क्रीडा संकुल येथे या स्पर्धेचा शेवट होईल. या मार्गावर धावपटूना प्रोत्साहन देण्यासाठी स्वयंसेवक आणि स्थानिक नागरिकही सहभागी होणार असल्याचे सिंग यांनी सांगितले.
पुण्यात २०१८ आणि २०१९ साली आयोजित हाफ मॅरेथॉन स्पर्धांना नागरिकांनी आणि देशाच्या इतर भागातील धावपटूनी उस्फूर्त प्रतिसाद दिला होता. पहिल्या वर्षी अर्थात २०१८ साली तब्बल १५,००० नागरिकांनी तर दुसऱ्या वर्षी अर्थात २०१९ साली तब्बल २०,००० नागरिकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. गेल्या दोन वर्षांच्या स्पर्धांप्रमाणे यंदाही ‘व्हील चेअर रन’ आयोजित करणार असल्याचे सिंग यांनी सांगितले.
स्पर्धेत सहभागी होऊ इच्छीणाऱ्या नागरिकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचेही आयोजन केले जाणार आहे. शहरातील १४ ठिकाणी आयोजित ६० दिवसांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात स्पर्धकांना विनामूल्य सहभाग घेता येणार आहे. पुणे महापालिकेच्या सहकार्याने आम्ही स्पर्धेच्या ठिकाणी सुशीभीकरण, रस्त्याची अवस्था सुधारणे आणि दिव्यांची सोय करणे अशी विविध कामे करणार असल्याचेही सिंग यांनी सांगितले.
पुण्यात सर्वोत्तम धावपटू आणि प्रशिक्षक वास्तव्यास आहे. याठिकाणी नागरिकांमध्ये धावण्याबाबत उत्साही भावना आहे आणि ते धावणे ही गोष्ट अतिशय आनंदाने साजरा करतात, अशी भावना सिंग यांनी यावेळी व्यक्त केली.
या स्पर्धेसाठी www.baphm.com. या संकेतस्थळावर नावनोंदणी करता येईल.
