दिव्यांग मुलांचा एक आनंददायी उनाड दिवस..!
पुणे : ‘गणपती बाप्पा मोरया‘, ‘अंबाबाईचा उदो उदो‘ असा गजर करत भक्तीगीतांमध्ये तल्लीन होत लोकप्रिय गीतांवर देहभान विसरून ताल धरत दिव्यांग मुलांनी आज एक उनाड पण आनंददायी, संगीतमय दिवसाचा अनुभव घेतला. निमित्त होते ते आनंद मेळाव्याचे!

वसंत ठकार फाउंडेशन, बालकल्याण संस्था, पुणे व सावली संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज (दि. 13 सप्टेंबर 2022) विशेष मुलांसाठी आनंद मेळाव्याचे आयोजन बालगंधर्व रंगमंदिरात करण्यात आले होते. ‘सारेगमप‘ लिटिल चॅम्प्स फेम रोहित राउत, कार्तिकी गायकवाड, मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे या गायक कलाकारांनी भक्तीगीते, अभंग, लावणी, पारंपरिक लोकगीते तसेच चित्रपट गीते सादर करून दिव्यांग मुलांना जवळपास तीन तास खिळवून तर ठेवलेच पण देहभान विसरून गाण्यांच्या तालावर नाचायलाही प्रोत्साहित केले. नाट्यगृहातून बाहेर पडताना दिव्यांग मुले, त्यांचे पालक आणि शिक्षकांच्या चेहऱ्यावर एक समाधानाचे हास्य दिसून येत होते.
अपंग कल्याण विभागाचे आयुक्त ओमप्रकाश देशमुख, बालकल्याण संस्थेच्या व्यवस्थापिका अपर्णा पानसे, वसंत ठकार फाउंडेशनचे संचालक आणि सावली संस्थेचे प्रकल्प संचालक वसंत ठकार, सावली संस्थेचे अध्यक्ष प्रविणकुमार छाजेड, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या रोहिणी मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

‘एकदंताय गौरी तनयाय‘, ‘इंद्रायणी काठी‘, ‘मी राधिका मी प्रेमीका‘, ‘हृदयात वाजे समथिंग‘, ‘कांदे पोहे‘, ‘मी हाय कोली‘, ‘सूरत पिया की‘, ‘उगवली शुक्राची चांदणी‘, ‘दमा दम मस्त कलंदर‘ ‘खंडेरायाच्या लग्नाला‘, ‘ये गो ये मैना‘ अशी एकाहून एक लोकप्रिये गीते सादर करून कलाकारांनी स्वत:बरोबरच दिव्यांग मुलांना केवळ ताल धरायला नाही तर गायलाही प्रोत्साहित केले. कलाकारांनी घातलेल्या सादेला प्रतिसाद देत दिव्यांगांनी गाण्याचाही मनमुराद आनंद लुटला. आवडत्या गीतांना उत्स्फूर्तपणे दाद देत ‘वन्स मोअर‘चा आग्रह केला. ‘झिंगाट‘ गाण्याच्या ठेक्यावर सभागृहातील प्रत्येकाने ताल धरत अनोखी मौज अनुभवली.
विशाल गंडतवार, केदार मोरे, रुतुराज पोहे, आदित्य आपटे, शैलेश देशपांडे, दिप्ती कुलकर्णी, यश भंडारे यांनी साथसंगत केली.
मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कलाकारांचे आणि मान्यवरांचे स्वागत वसंत ठकार यांनी तर प्रास्ताविक प्रविणकुमार छाजेड यांनी केले. सूत्रसंचालन दिप्ती भागवत यांनी केले.
ओमप्रकाश देशमुख म्हणाले, जीवनात कला, साहित्य आणि क्रीडा यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. यांच्याशिवाय जीवन रुक्ष होते. दिव्यांग मुलांमध्येही कलागुण दडलेले असतात. त्यांना संधी मिळाल्यास ते त्यांची कला चांगल्याप्रकारे सादरही करू शकतात. दिव्यांग मुले आणि त्यांच्या पालकांसाठी आयोजित केलेल्या आनंद मेळाव्याबद्दल वसंत ठकार यांचे त्यांनी कौतुक केले.
वसंत ठकार म्हणाले, काही दिव्यांग मुलांना बोलता येत नाही, काहींच्या मेंदूला पक्षाघात झाल्यामुळे त्यांना त्यांचा भावना व्यक्त करता येत नाहीत, परंतु संगीताचा उपयोग मुलांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी होत असतो ही बाब महत्त्वाची मानून विशेष मुलांच्या मनोरंजनासाठी गाण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले. अपर्णा पानसे यांनी मनोगत व्यक्त केले.
