शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद यांचे निधन
नरसिंहपूर – शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद यांचे निधन झाले. ते 99 वर्षांचे होते. मध्य प्रदेशमधील नरसिंहपूर जिल्ह्यात गोटेगाव जवळील झोटेश्वर धाम येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते द्वारकेचे शारदा पीठ आणि ज्योर्तिमठ बद्रीनाथचे शंकराचार्य होते.
शंकराचार्यांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी प्रदीर्घ कायदेशीर लढा दिला होता. स्वातंत्र्य लढ्यातही त्यांचा सहभाग होता. स्वरूपानंद सरस्वती हे हिंदूंचे सर्वात मोठे धार्मिक नेते मानले जात होते. शेवटच्या क्षणी शंकराचार्यांचे अनुयायी आणि शिष्य त्यांच्या जवळ होते.
स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचा जन्म मध्य प्रदेश राज्यातील सिवनी जिल्ह्यातील दिघोरी गावात एका ब्राह्मण कुटुंबात झाला. आई-वडिलांनी त्यांचे नाव पोथीराम उपाध्याय ठेवले. वयाच्या 9 व्या वर्षी त्यांनी घर सोडले आणि धर्माचा प्रवास सुरू केला.
यादरम्यान ते उत्तर प्रदेशातील काशीलाही पोहोचले आणि येथे त्यांनी ब्रह्मलीन श्री स्वामी करपात्री महाराज वेद-वेदांग हे धर्मग्रंथ शिकले. 1942 च्या काळात वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी ते क्रांतिकारी संन्यासी म्हणून प्रसिद्ध झाले. कारण त्यावेळी देशात इंग्रजांपासून स्वातंत्र्य लढा चालू होता.
स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी 1950 मध्ये ज्योतिषपीठाचे ब्रह्मलीन शंकराचार्य स्वामी ब्रह्मानंदर सरस्वती यांच्याकडून दंड सन्यासाची दीक्षा घेतली होती. 1981 मध्ये त्यांना शंकराचार्य उपाधी देण्यात आली.
