Thursday, May 7, 2026
Latest NewsPUNE

साहित्याला प्रतिभा आणि अनुभवाची जोड हवी – डाॅ. न.म.जोशी

पुणे : एका तटस्थ आणि संवेदनशील शिक्षकाने अनुभवातून फुलवलेली पुष्पवाटिका म्हणजे हा काव्यसंग्रह. आजच्या या काळात कवींची प्रचंड मांदियाळी आहे. लोकांना लिहावेसे वाटत आहे आणि व्यक्त व्हावेसे वाटत आहे, ही भावना महत्वाची आहे. परंतु त्या साहित्याला प्रतिभेची आणि अनुभवाची जोड असेल तर ते उंचीला जाते. कवींना खरी दाद मिळाली पाहिजे. कवितेतील उणीव देखील सांगितल्या गेल्या तर आज वाढणाऱ्या कवींमध्ये खूप सुधारणा होईल, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डाॅ. न.म. जोशी यांनी व्यक्त केले.

श्री.वा.कुलकर्णी यांच्या ‘सुमश्री’ कवितासंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन सदाशिव पेठेतील पेरूगेट मुलांच्या भावे हायस्कूलमध्ये करण्यात आले. यावेळी भारतीय शिक्षण चे संपादक प्रा. डॉ.वामनराव गोगटे, समीक्षक प्रा. बाळकृष्ण कवठेकर, लेखक डॉ. कमलेश सोमण, कवितासंग्रहाचे लेखक व आयोजक श्री.वा. कुलकर्णी, सुखद कुलकर्णी, मधुरिमा फुटाणे आदी उपस्थित होते.

प्रा. डॉ. वामनराव गोगटे म्हणाले, कविता वाचनाचे जाहीर कार्यक्रम होणे आता बंद झाले आहे. त्यामुळे कवींना दाद मिळत नाही. परंतु ग्रामीण भागात आजही असे कार्यक्रम होताना दिसतात. या कवितासंग्रहातील कविता म्हणजे प्रत्यक्ष अनुभवातून उमगलेला आशयाचा आविष्कार आहे. समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेल्या कवी पंरपरेतील श्री.वा. कुलकर्णी हे एक साधक आहेत, असेही त्यांनी सांगितले.

श्री.वा.कुलकर्णी म्हणाले, समाजातील विविध स्तरांवरील विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास पाहिला आणि त्याचे काहीसे प्रतिबिंब माझ्या कवितेमधून दिसते. त्यातील प्रत्येक क्षण काव्यात टिपता आले नसले तरी त्या अनुभवांची शिदोरी माझ्याजवळ आहे. शिक्षणाचे महत्व समाजातील प्रत्येकापर्यंत पोहचले पाहिजे आणि ते पोहचविण्याचा प्रयत्न मी कवितेच्या माध्यमातून करीत आहे, असेही त्यांनी सांगितले.

बाळकृष्ण कवठेकर म्हणाले, या काव्यसंग्रहातील कविता या आशय संपन्न असून शालेय जीवनात रममाण व्हायला लावणाऱ्या कविता आहेत, असेही त्यांनी सांगितले. डॉ. कमलेश सोमण म्हणाले, कवितेतून सखोल, समृद्ध आणि स्वतत्र्य शिक्षणाशय दिसतो. नवनव्या शोधाच्या आणि निर्मितीच्या शोधात असणारा संवेदनशील शिक्षक देखील या कवितेमधून दिसतो, असेही त्यांनी सांगितले. आनंद सराफ यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading