Thursday, May 7, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार – उद्धव ठाकरे

मुंबई : “दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार,” असा निर्धार शिवसेनापक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. विश्व हिंदू परिषदेचे  नेते उद्धव कदम यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला.

शिवसेनेनं २२ ऑगस्टला मुंबई महापालिकेकडे दसरा मेळाव्यासाठी अर्ज केला होता, परंतु शिवसेनेला अद्याप परवानगी मिळालेली नाही. त्यामुळं शिंदे गटही दसरा मेळावा घेण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे. याबाबत ठाकरेंना विचारले असता ते म्हणाले, “तात्रिंक-मांत्रिक बाबी काहीही असो मेळावा आम्ही शिवतीर्थीवर घेणार ,” “दसऱ्या मेळाव्याबाबत संभ्रम नाही,दसरा मेळावा होणारच,” असे ठाकरेंनी ठणकावून सांगितले.

शिवसेनेतून बंड करत भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यापासून शिंदे गट आणि शिवसेनेत स्थानिक पातळीपासून तर सुप्रीम कोर्टापर्यंत संघर्ष सुरू आहे. याआधी शिंदे गटानं प्रतिशिवसेना भवन उभारण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता शिंदे गट दसरा मेळाव्यासाठीही प्रयत्न करत असल्याची माहिती आहे.

शिवसेनेनं दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी मुंबई महापालिकेकडे अर्ज केला आहे, मुंबई महापालिकेकडून वर्षभरात काही ठराविक कार्यक्रमांनाच परवानगी देण्यात येत असते, त्यात शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचाही समावेश आहे, परंतु अद्यापही महापालिकेनं शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला परवानगी दिल्याची माहिती समोर आलेली नाही.

उद्धव ठाकरे म्हणाले “हिंगोलीतले मातब्बर लोक शिवसेनेत प्रवेश करत आहेत. मला एका गोष्टीचा अभिमान आणि आश्चर्य वाटते. साधारणत: सत्ताधारी पक्षाकडे प्रवेशासाठी रांग लागते. संघ परिवारातील लोक हिंदुत्त्वाच्या शिवसेनेच्या परिवारात प्रवेश करत आहेत. पण पहिल्यांदाच महाराष्ट्रात वेगळं चित्र दिसत आहेत. कारण गद्दारीनंतर महाराष्ट्राची माती ही मर्दांना जन्म देते, गद्दारांना नाही, याची प्रचिती दाखवणारी मंडळी शिवसेनेत येत आहेत. आम्ही हिंदुत्त्व सोडलं अशी आवई भाजपने उठवली होती, त्याला छेद देणारी ही सगळी घटना आहे.”

“शिवसेनेचं हिंदुत्त्व हे खरं हिंदुत्त्व आहे, भ्रमित करणारं नाही. कारण मूळ हिंदुत्त्व हे मातोश्रीने दाखवून दिलं आहे. म्हणून या मातोश्रीचं महात्म्य आणि महत्त्व टिकवण्यासाठी मी इथे आलो आहे. माझ्या माध्यमातून मी सर्व बांधवांना सांगत आहेत, तिथे अस्वस्थ वाटत असेल तर मातोश्रीचं दार उघडं आहे. मुंबई टिकली तर महाराष्ट्र टिकेल,” असे उद्धव कदम यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading