Thursday, May 7, 2026
Latest NewsPUNE

अभिनेत्याचा पहिला संवाद घडतो मूक अभिनयातून : योगेश सोमण

पुणे : अभिनय करीत असताना संवाद सुरू होण्यापूर्वी कलावंताचे शरीर बोलत असते. पहिला संवाद हा मूक अभिनयातूनच होत असतो. शरीर बोलते करण्याच्या दृष्टीने मूक अभिनय कार्यशाळा खूप उपयुक्त ठरतात. मूक अभिनय म्हजणे केवळ मूक कृती नाहीये तर शरीराचे संतुलन, शरीराची लय या सगळ्या गोष्टींचा विचार कशा पद्धतीने करावा याची दिशा कार्यशाळेत मिळते, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते योगेश सोमण यांनी व्यक्त केले.

केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाअंतर्गत असलेल्या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या पुणे विभागीय कार्यालय (आयसीसीआर) आणि एम. इ. एस. कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टस्‌‍ यांच्या संयुक्त विद्यमाने दोन्ही संस्थांमधील विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसीय मुकाभिनय (माईम वर्कशॉप) कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना सोमण यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देण्यात आले. त्यावेळी सोमण बोलत होते. एम. इ. एस. कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टस्‌‍ येथे कार्यशाळा झाली. एनएसडीचे (सिक्कीम) विद्यार्थी अभिनेते सुमितकुमार ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले.
कार्यशाळेचे उद्घाटन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), आयसीसीआर विभागीय कार्यालयाच्या संचालिका निशी बाला, एमइएसच्या डॉ. माधवी मेहेंदळे, डॉ. गोविंद कुलकर्णी, आयसीसीआरच्या कार्यक्रम अधिकारी संजीवनी स्वामी, कार्यशाळेचे प्रशिक्षक सुमितकुमार ठाकूर आदी उपस्थित होते. 

एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) म्हणाले, पुण्याची ओळख केवळ आयटी हब अशी नाही तर सांस्कृतिक नगरी अशीही आहे. आयुष्यात अनेकदा आपल्याला अभिनय करावा लागतो याचा मला माझ्या कारकिर्दीत अनुभव आला आहे. डॉ. माधवी मेहेंदळे यांनी संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली. भूषण गोखले, डॉ. माधवी मेहेंदळे, डॉ. गोविंद कुलकर्णी यांचा सत्कार निशी बाला यांच्या हस्ते करण्यात आला. आयसीसीआरअंतर्गत भारतीय कलांचे प्रशिक्षण घेत असलेला अफगाणी विद्यार्थी वली रहेमान रहेमानी याने मनोगतात भारतीय चित्रपट आणि अफगाण यांच्यातील अनुबंध काही भारतीय चित्रपटांचे दाखले देऊन अधोरेखित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुप्रिता लेले यांनी केले.
मुकाभिनय कार्यशाळेच्या समारोप समारंभापूर्वी सहभागी विद्यार्थ्यांचे सादरीकरण झाले. प्रसिद्ध अभिनेते आणि आयसीसीआर सल्लागार समितीचे सदस्य योगेश सोमण, आयसीसीआर विभागीय कार्यालयाच्या संचालिका निशी बाला, आयसीसीआरच्या कार्यक्रम अधिकारी संजीवनी स्वामी, डॉ. गोविंद कुलकर्णी, प्रशिक्षक अभिनेते सुमितकुमार ठाकूर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृषाली लेले यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading