Sunday, September 6, 2026
Latest NewsPUNE

देशसेवेसाठी कृतिशील नागरिक होणे गरजेचे – ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त)

पुणे : सैनिकांप्रमाणे देशातील प्रत्येक नागरिकाने देशासाठी चांगले काम करण्याची गरज आहे. कारण देशाच्या सुरक्षेला असणारे धोके फक्त सीमेवर नाहीत तर देशात देखील आहेत. देशाच्या सीमेवर राहून जवान लढाई करीत आहेत पण देशांतर्गत चालणारी युद्ध आपल्याला जिंकली पाहिजे. प्रत्येकाने स्वदेशी वस्तू विकत घेवून चीनने आपल्या देशाच्या आर्थिक व्यवस्थेत केलेली घुसखोरी हटवा. त्याचबरोबर आंदोलन करून सार्वजनिक वस्तूंची तोडफोड करण्यापेक्षा समाजोपयोगी कामे करून आंदोलन करा. प्रत्येक नागरिकामध्ये देशप्रेमाची भावना असते. परंतु त्यासाठी कृतिशील नागरिक झाले पाहिजे, असे मत ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त) यांनी व्यक्त केले.

गुरूवार पेठेतील प्रभात मित्र मंडळाच्यावतीने प्रभात शौर्य पुरस्कार अर्पण सोहळ्याचे आयोजन महात्मा फुले पेठेतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात येथे करण्यात आले. यावेळी विश्व हिंदू परिषद महाराष्ट्र प्रदेशचे क्षेत्रीय मंत्री शंकर गायकर, विश्व हिंदू परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री संजय मुरदाळे, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज सुरेंद्र मोहिते, प्रभात मित्र मंडळाचे अध्यक्ष किशोर चव्हाण, उत्सवप्रमुख दत्ता काळे, कृष्णा परदेशी, मंगेश शिंदे, उदय वाडेकर, रवींद्र भन्साळी, राजेश नाईक, अविनाश निरगुडे, कुणाल जगताप आदी उपस्थित होते.

यावेळी हुतात्मा रोमित चव्हाण यांचे वडिल तानाजी चव्हाण यांच्याकडे, तर हुतात्मा नवनाथ भांडे यांच्या पत्नी विजया भांडे आणि मुलगा राज भांडे यांच्याकडे शौर्य पुरस्कार सुपूर्द करण्यात आला. शाल सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, रुपये २५ हजार असे पुरस्काराचे स्वरूप हते. तसेच समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संजय जाजू, किरण सोनिवाल, पुष्कर्णी भट्टड यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

शंकर गायकर म्हणाले, देशातील प्रत्येक नागरिकासाठी कारगिल हे तीर्थस्थान आणि त्या युद्धात लढलेले जवान हे आपले दैवत आहेत. इतिहासातील प्रत्येक पान हे महापुरुषांच्या शौर्याने भरलेले आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा आणि काम करा. देशावरील संकट नष्ट करायचे असेल तर प्रत्येकाला देशासाठी काहीतरी केले पाहिजे. देशासाठी बलिदान दिलेल्या जवानांना आणि त्यांच्या शौर्याला विसरू नका. देश संकटात आहे आणि आपण देशासाठी काय करीत आहोत याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे, असे ही त्यांनी सांगितले.

किशोर चव्हाण म्हणाले, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते टिकविण्यासाठी अनेक जवान प्राणाची बाजी लावून देशाचे रक्षण करीत आहेत. त्यांचे कार्य समाजापर्यंत पोहचविण्यासाठी आणि त्यांच्या कुटुबिंयाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रभात शौर्य पुस्काराचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. प्रभात मित्र मंडळाच्यावतीने समाजातील प्रत्येक व्यक्तीसाठी विविध उपक्रम राबविले जातात. हे मंडळ पुण्याच्या पूर्व भागातील एक आदर्श मंडळ म्हणून ओळखले जाते, असे ही त्यांनी सांगितले. निलेश कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. अजय गंधे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading