Saturday, October 24, 2026
Latest NewsPUNE

गणेशोत्सवात आनंदवन तर्फे व्यसनमुक्ती जनजागृती अभियान

पुणे : आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र व सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालयाच्या वतीने नशामुक्त भारत अभियानांतर्गत यंदाच्या गणेशोत्सवात व्यसनमुक्ती जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. पुणे शहर व उपनगरांतील विविध गणेशोत्सव मंडळांसमोर व्यसनमुक्तीचा संदेश देणारी पथनाट्ये व लघुपट दाखविण्यात येणार आहेत, अशी माहिती आनंदवन व्यसनमुक्ती केंद्रातर्फे पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला संतोष पटवर्धन, प्रमोद शेळके, केतन जैन आदी उपस्थित होते.

गणेशोत्सवात दिनांक १ ते ८ सप्टेंबर दरम्यान दररोज सायंकाळी ७ ते ९ यावेळेत हे अभियान राबविण्यात येणार आहे. शिवाजीनगर, औंध, येरवडा, जयजवान नगरसह शहरातील विविध भागांत पथनाटय सादरीकरण होणार आहे. पथनाटयातील पाच कलाकार व आनंदवनचे कार्यकर्ते मिळून १० जणांचा संघ या उपक्रमात दररोज सहभागी होईल.

आनंदवन व्यसनमुक्ती केंद्रातर्फे विळखा नावाचा लघुपट देखील साकारण्यात आला आहे. त्यामध्ये व्यसनाधिनतेमुळे होणारे अपाय, त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग व इतर माहिती देण्यात आली आहे. हा लघुपट देखील मंडळांसमोर विनामूल्य स्वरुपात दाखविण्यात येणार आहे. तसेच जनजागृतीपर फलक देखील लावण्यात येणार आहेत. अनेक मंडळांनी या उपक्रमाबाबत केंद्राशी संपर्क साधला असून ज्या मंडळांना हा कार्यक्रम करायचा असेल, त्यांनी केंद्राच्या ९३७३७६३६३६ या क्रमांकावर संपर्क साधावा. जास्तीत जास्त गणेशोत्सव मंडळांसमोर पथनाटय व लघुपट सादरीकरण करुन व्यसनमुक्तीचा संदेश देण्याचा प्रयत्न गणेशोत्सवात केला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading