Tuesday, May 5, 2026
Latest NewsPUNE

देशाच्या प्रगती आणि विकासाची पायाभरणी ही राजीव गांधींच्या काळातच झाली – पृथ्वीराज चव्हाण 

पुणे : भारत देश आज प्रगती आणि विकासाची फळे चाखतो आहे. त्याची पायाभरणी केंद्रातील राजीव गांधी सरकारच्या काळात झाली. याचे स्मरण आपण ठेवले पाहिजे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे.

भारतरत्न दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या ७८ व्या जयंती निमित्त, कात्रज प्राणी संग्रहालय येथील त्यांचे अर्ध पुतळ्यास आज पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. राजीव गांधी स्मारक समिती, कात्रज, पुणे तर्फे आयोजित या कार्यक्रमात पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. अध्यक्षस्थानी पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे उपस्थित होते. यावेळी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, मोहन जोशी, आबा बागुल, दीप्ती चौधरी, कमलताई व्यवहारे आदि नेते उपस्थित होते. स्मारक समिती सदस्य भोला वांजळे, सुभाष थोरवे, आबा जगताप, संजय अभंग, लहुआण्णा निवंगुणे, महेश अंबिके, घनःश्याम निम्हण इ उपस्थित होते.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, इंदिराजींच्या दुर्दैवी व अचानक झालेल्या हत्त्येनंतर एका आपत्कालीन परिस्थितीत राजीव गांधी यांच्यावर पंतप्रधान पदाची जबाबदारी आली. ही जबाबदारी अत्यंत कौशल्याने पार पाडत असताना त्यांनी देशा पुढच्या अनेक मूलभूत समस्या हातावेगळ्या केल्या. त्यांच्या काळात दहशतवादी संघटनांचे मोठे आव्हान होते. ईशान्य भारत, पंजाब, श्रीलंका या ठिकाणी ही आव्हाने खूप प्रबळ होती. त्यावर राजीव गांधींनी तोडगे काढले. एकविसाव्या शतकातील भारताची नेमकी गरज लक्षात घेऊन संगणकीकरण, आणि दूरसंचार क्षेत्राचे आधुनिकीकरण राजीव गांधी यांनी सुरू केले. हे काम त्यांनी त्या काळात केले नसते तर भारताला या क्षेत्रात प्रगती साधण्यासाठी आणखी पंधरा-वीस वर्ष लागली असती. त्यामुळे देशास २१ व्या शतकाची दृष्टी (व्हिजन) त्यांनीच दिले. इंटरनेट, विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्रातील पायाभूत प्रगती मुळेच देश आर्थिक महासत्ता होऊ घातला आहे याचे श्रेय स्व राजीव गांधी यांनाच जाते.

पुढे ते म्हणाले, आज काँग्रेस पुन्हा समर्थपणे उभी करणे ही आपली जबाबदारी आहे. त्यासाठी आपण सगळे नव्या जोमाने प्रयत्न करू.

कार्यक्रमाचे संयोजक, राजीव गांधी स्मारक समितीचे प्रमुख व काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी प्रास्ताविक केले. स्मारक समितीचे बाळासाहेब मारणे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading