अपंग कल्याणकारी संस्थेच्या मुलांनी फोडली ‘आपली दहीहंडी
पुणे : गोविंदा आला रे आला… जरा मटकी संभाल ब्रीज बाला… बँडवर वाजविलेली गाणी आणि ढोल ताश्यांच्या ठेक्यावर त्यांचे ही पाय थिरकले. शरीराने व्यंगत्व असूनही थरावर थर रचत वानवडी येथील अपंग कल्याणकारी संस्थेच्या बाळगोपाळांनी कसबा पेठेतील दहीहंडी मोठ्या उत्साहात फोडली. या चिमुकल्याना भिजवण्यासाठी वरुणराजाने ही हजेरी लावली.
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीतर्फे कै.सौ.प्राची प्रकाश काळे स्मरणार्थ आपली दहीहंडी आणि माता यशोदा सन्मान सोहळ्याचे आयोजन कसबा पेठेतील माणिक चौकाजवळील अमेय सोसायटीच्या आवारात करण्यात आले होते. यावेळी विशेष मुलांचे संगोपन करणाऱ्या संतुलन पाषाण शाळेतील मावशी ॲलीस जोसेफ मसीह यांना स्व.सौ.प्राची प्रकाश काळे स्मरणार्थ “माता यशोदा सन्मान” प्रदान करण्यात आला. साडीचोळी, सन्मानपत्र असे सन्मानाचे स्वरूप होते. कार्यक्रमाला प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे, प्रा.संगीता मावळे, अरुणकुमार बाभुळगावकर, होनराज मावळे उपस्थित होते. ओंकार चिकणे, प्रिती यादव, हर्ष येळापुरे यांनी नियोजनात सहभाग घेतला. कार्यक्रमाचे यंदा २१ वे वर्ष आहे. यावेळी न्यू गंधर्व बँड व त्र्यंबकेश्वर प्रतिष्ठानचे ढोलताशा पथकाने वादन केले.
वानवडी येथील अपंग कल्याणकारी संस्थेला गोपाळकाला म्हणून बेडशीटस् मदत देण्यात आली.
शिवभूषण निनादराव बेडेकर यांच्या स्मरणार्थ ‘स्वरगोकुळ’ हा गायनाचा कार्यक्रम अवधूत गांधी यांनी सादर केला. अभय नलगे (हार्मोनियम) , होनराज मावळे (तबला) यांनी साथसंगत केली. समस्त नामदेव शिंपी दैव मंडळ कसबा पेठ, मॉडर्न कॉलेज आॅफ आर्टस् सायन्स अँड कॉमर्स (डब्ल्यू.सी.बी.एस.), श्री दत्त आनंद परिवार यांनी कार्यक्रमाला सहकार्य केले.
