Tuesday, May 5, 2026
Latest NewsMAHARASHTRA

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील अधिकृत विद्यार्थ्यांना न्याय मिळावा – अभाविप

राहुरि : राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये कार्यक्षेत्र असलेल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी पदव्युत्तर व पी.एचडी. चे शिक्षण घेणाऱ्या अधिकृत विद्यार्थी व विद्यापीठाच्या वसतिगृह आवारात बेकायदेशीरपणे राहणारे विद्यार्थी (पॅरासाईट विद्यार्थी) यांच्यामध्ये काही दिवसांपुर्वी भांडण झाले व त्यामुळे संघर्षाचे वातावरण निर्माण झाले. त्याचा परिणाम म्हणून कुलगुरूंच्या घरावरती अनाधिकृत विद्यार्थ्यांनी दगडफेक केली. हा प्रकार अतिशय निंदनीय असून अभाविप या घटनेचा तीव्र निषेध करते. मात्र या प्रकारामुळे अनधिकृतपणे राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा अधिकृत विद्यार्थ्यांवर दबाव वाढत चालला आहे. यांची दखल घेवून विद्यापीठाने हा भोंगळ कारभार बंद करून अधिकृतपणे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी आज अभाविप प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे यांनी पत्रकार परिषदेत मांडली.

विद्यापीठ परिसरात कृषी पदविका व संशोधन करणारे अधिकृत पणे साधारण 300 विद्यार्थी राहतात परंतु ज्या विद्यार्थ्यांचा विद्यापीठात कोणत्याही अभ्यासक्रमाला प्रवेश नाही असे 500 पेक्षा अधिक विद्यार्थी अनधिकृतपणे राहत आहेत. या विद्यार्थ्यांमुळे पदविका शिक्षण घेणाऱ्या व संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृहातील खोल्या, मेस, ग्रंथालय व अन्य पायाभूत सुविधा प्राप्त होत नाहीत व सुविधांचा उपभोग घेता येत नाही. प्रत्यक्षात अनधिकृत विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे व विद्यापीठ प्रशासनाचा त्यांच्यावर कुठलाही वचक नसल्यामुळे अधिकृत विद्यार्थी दबावात शिक्षण घेत आहेत. या विषयात अधिकृतपणे राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी कुलगुरू व प्रशासनाकडे तक्रार केली असता, त्यावर कुलगुरूंनी कार्यवाही करण्यापूर्वीच बेकायदेशीरपणे राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी कुलगुरूच्या घरावर दगडफेक केली व संशोधक विद्यार्थ्यांवर हल्ला केला. हा प्रकार अतिशय निंदनीय असून अभाविप या घटनेचा तीव्र निषेध करते.

काही राजकीय नेते, प्रशासनातील भ्रष्ट अधिकारी बेकायदेशीरपणे राहणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देत असून कुलगुरुंवर दबाव आणत आहे. तरी कोणत्याही दबावाला कुलगुरु डॉ. प्रशांत कुमार पाटील यांनी बळी पडू नये. अभाविप अधिकृत विद्यार्थ्यांच्या पाठीमागे ठामपणे उभी आहे. या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करून अधिकृत विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत अभाविप हा लढा सुरू ठेवेल असे आश्वासन अधिकृत विद्यार्थ्यांना भेटून प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे यांनी दिले. यावेळी प्रदेश शोधकार्य संयोजक आंबादास मेव्हणकर, ओमकार मगदूम, मयुरेश म्हसे, सिद्धेश सोमाणी व अन्य विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading