रायगडच्या पार्श्वभूमीवर पुण्यातही ‘हाय अलर्ट’
पुणे : आज दुपारी रायगडमध्ये हरिहरेश्वर येथे बेवारस बोटीवर शस्त्र सापडल्यानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून राज्यात ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. तसेच राज्यातील सर्व प्रमुख ठिकाणी, महत्वाची शहरे आणि सागरी महामार्गावरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
रायगडच्या पार्श्वभूमीवर पुण्यातही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे पोलीस आयुक्त अभिताभ गुप्ता यांनी तात्काळ अधिकाऱ्यांची बैठक बोलावून सतर्कतेच्या सूचना दिल्या. ठिकठिकाणी नाकाबंदी केली जात आहे. पुणे शहरामध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. जंगली महाराज रोडवर पोलिसांकडून नाकाबंदी करून प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जात आहे. पोलीस गाडीत बसलेल्या लोकांची चौकशी करत आहेत, त्यानंतरच त्यांना येथून पुढे सोडण्यात येत आहे.
