Saturday, June 20, 2026
Latest NewsPUNE

कामगारांचा लढा अधिक तीव्र होणार; राज्यभरातून कामगार संघटनांचा पाठिंबा

यशवंतभाऊ भोसले यांच्या उपोषणाचा 8 वा दिवस

पुणे : केंद्र सरकारच्या कामगार कायद्याच्या नवीन धोरणा विरोधात तसेच कोरोना काळात नोकरी वरून काढलेल्या कामगारांना पुन्हा कामावर परत घ्यावे यासाठी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. कामगारांच्या बाजूने उभारण्यात आलेल्या या लढ्याला संभाजी ब्रिगेडसह अनेक कामगार संघटनांनी पाठिंबा दिला आहे. तसेच शासनाने या लढ्याची दखल न घेतल्यास राज्यभर रास्ता रोको, चक्काजाम व आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे हा कामगारांचा लढा अधिक तीव्र होणार आहे.     

यशवंतभाऊ भोसले हे गेल्या आठ दिवसांपासून अप्पर कामगार आयुक्त कार्यालय, पुणे येथे प्राणांतिक उपोषणाला बसले आहे. आज या उपोषणाला संभाजी ब्रिगेड, कष्टकरी कामगार पंचायत, भारतीय मजदूर संघ, रिपब्लिक पार्टी (आठवले गट), कामगार नेते आणि कृषी तज्ज्ञ डॉ. बुधाजिराव मुळीक आदींनी पाठिंबा दिला आहे. या लढ्यात राज्यभरातील कामगार संघाटांनी उतरावे असे आवाहन भोसले यांनी केले आहे. दरम्यान, केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव व राज्य कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी या आंदोलनाची दखल घेतली, मात्र कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने हे उपोषण सुरूच आहे.

संभाजी ब्रिगेडचे चंद्रशेखर घाडगे म्हणाले, कोरोना काळात ज्या पाच कंपन्यांनी कामगारांना कामावरून काढले आहे त्या कंपन्यांचा कंत्राटी परवाना रद्द करण्यात यावा. या कंपन्यांच्या मालकांवर जवळपास 72 गुन्हे दाखल आहेत. मात्र आजवर कोणावरही कारवाई झालेली नाही. सरकारचे कामगारांकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असून हे सरकार केवळ उद्योगपतींचे आणि कंत्राटदारांच आहे. प्रशासनाने हे उपोषण गांभीर्याने न घेतल्यास संभाजी ब्रिगेडच्या वतीने राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालय आणि विभागीय कार्यालय येथे उपोषण करण्यात येईल.

कष्टकरी कामगार पंचायतचे बाबा कांबळे म्हणाले, दिल्लीत शेतकरी रस्त्यावर आले अन् अनेक महिन्यांच्या लढयानंतर शेतकरी कायदा रद्द करण्यात आला. अशाच प्रकारचा लढा आपण कामागारांनी एकत्र येवून या कंत्राटी कामगार कायद्या विरोधात उभा करण्याची आज गरज आहे. आज या कामगार उपोषणाचा आठवा दिवस आहे. मात्र प्रशासनाने हे गांभीर्याने घेतलेले नाही. असेच चालू राहिल्यास रिक्षा चालक, फेरीवाले, सफाई कामगार हे रस्त्यावर उतरून चक्का जाम करतील असा इशारा ही त्यांनी दिली.

देशात खाजगी कामगार, असंघटीत कामगार यांचा प्रश्न मोठा आहे. या शोषित, पिडीत कष्टकरी कामगारांसाठी यशवंतभाऊ भोसले यांचे उपोषण गेल्या आठ दिवसांपासून सुरू आहे. कामगारांसाठी त्यांनी उठवलेल्या आवाजाला त्यांच्या उपोषणाला पुणे, पिंपरी परीसरातील कामगार संघाटांनी, असंघटीत कामागारांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून पाठिंबा द्यावा, असे आवाहन भारतीय मजदूर संघाचे अण्णा धुमाळ यांनी केले. आता हा प्रश्न केवळ कामगारांचा न राहता सामाजिक प्रश्न झाला आहे. त्यामुळे या लढ्यासाठी आवश्यक असलेले सर्व सहकार्य भारतीय मजदूर संघ करेल असे, आश्वासन दिले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading