Sunday, September 6, 2026
Latest NewsPUNE

उत्कृष्ट आणि सर्जनशील काम ही खरी देशभक्ती – माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांचे मत

पुणे  : देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी देशप्रेमी नागरिकांनी जीवनातील आपापल्या क्षेत्रात उत्कृष्ट आणि सर्जनशील काम करणे, ही खरी देशभक्ती असल्याचे मत माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) संस्थापक दिनानिमित्त बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात (बीएमसीसी) आयोजित कार्यक्रमात धर्माधिकारी बोलत होते. गेल्या शैक्षणिक वर्षात विविध क्षेत्रांमध्ये नैपुण्य मिळविणार्‍या विद्यार्थी आणि प्राध्यापकांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

महाविद्यालय स्थानिक विकास समितीचे अध्यक्ष सागर फडके कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते. डीईएसचे उपाध्यक्ष महेश आठवले, प्राचार्या डॉ. सीमा पुरोहित, उपप्राचार्य डॉ. जगदीश लांजेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

धर्माधिकारी म्हणाले, ‘‘राष्ट्रीयत्व, एकात्मता, लोकशाही आणि राज्यघटना बळकट होत गेली. गाव वस्तीवर त्याची पाळेमुळे घट्ट झाली. विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात देशाने मोठी प्रगती केली. एकाही क्षेत्रात भारत मागे नाही. शास्त्रज्ञांनी देशाची शान वाढवली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ही मोठी उपलब्धी आहे.’’

धर्माधिकारी पुढे म्हणाले, ‘‘पर्यावरणाची समस्या, चीन व पाकिस्तान या दोन आघाड्यांवर लढाईची शक्यता, देशांतर्गत नक्षलवाद आणि इस्लामिक दहशतवाद ही देशासमोरील प्रमुख आव्हाने आहेत. त्यांचा लोकशाही आणि राज्यघटनेच्या चौकटीत बंदोबस्त करता आला पाहिजे.’’

डॉ. सीमा पुरोहित यांनी स्वागत व प्रास्ताविक, स्मृती पटवर्धन यांनी परिचय, डॉ. जगदीश लांजेकर यांनी अहवाल वाचन, प्रा. रूपाली देशपांडे यांनी सूत्रसंचालन आणि वसंत धिवार यांनी आभार प्रदर्शन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading