Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

राष्ट्रीय एकात्मतेशी निगडीत विषय असला, तर काश्मीर हे केंद्रस्थानी – आयएएस अधिकारी डॉ.सागर डोईफोडे 

पुणे : देशाच्या उत्तरेकडील काश्मीर हा अतिशय दुर्गम भाग आहे. केवळ राष्ट्रीयच नाही, तर आंतरराष्ट्रीय आयाम या भागाला आहे. राष्ट्रीय एकात्मतेशी निगडीत विषय असला, तर काश्मीर हे कायमच केंद्रस्थानी येते, असे मत काश्मीरमधील आयएएस अधिकारी डॉ.सागर डोईफोडे यांनी व्यक्त केले.

परिवर्तन संस्थेतर्फे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त काश्मीरमधील दुर्गम गावांमध्ये १ हजार तिरंगी झेंडे पाठविण्यात आले. शिवाजीनगर येथील संचेती हॉस्पिटलमध्ये झालेल्या कार्यक्रमात ध्वज पूजन करुन ते सुपूर्द करण्यात आले. यावेळी पद्मविभूषण डॉ.के.एच.संचेती, परिवर्तन संस्थेचे अध्यक्ष डॉ.शैलेश गुजर, आम्ही पुणेकर संस्थेचे हेमंत जाधव, नलिनी कुमार, मनिषा संघवी, डॉ. कर्नल पंडीता, राहुल चोभे, अखिलेश झांजले आदी उपस्थित होते.

डॉ.सागर डोईफोडे म्हणाले, काश्मीर हा आपल्या देशातील अतिशय संवेदनशील भाग आहे. त्या भागात पुण्यातून १ हजार ध्वज पाठविण्यात येत आहेत, ही कौतुकास्पद बाब आहे. भारतीय ध्वज हे राष्ट्रीय प्रतिक आहे. ध्वजातील रंगांप्रमाणे आपण प्रत्येक भारतीय एकमेकांशी कसे जोडले जातो, हे महत्वाचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

डॉ.के.एच.संचेती म्हणाले, काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे ,आणि तो याही पुढे राहणारच आहे. अशा प्रकारे भारताच्या इतर भागांतूनही काश्मीरशी संबंध प्रस्थापित झाल्यास देश मजबूत होण्यास मदत होईल आणि हे कार्य परिवर्तन संस्था करते आहे हे अतिशय महत्त्वाचे आणि योग्य कार्य संस्था करत आहे. यावेळी त्यांनी डॉ. सागर डोईफोडे या मराठी तरुणाचाही सन्मान केला, कारण महाराष्ट्रीय तरुण काश्मिर मध्ये उत्तम कार्य करत आहे याचा मला मराठी म्हणून अभिमान आहे, असे ते म्हणाले.

डॉ.शैलेश गुजर म्हणाले, परिवर्तन संस्था ही १९८० सालापासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. सन १९९७ साली देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी सुवर्ण महोत्सवानिमित्त संस्थेने तिरंगा वाटपाचा कार्यक्रम सुरू केला होता. आज तिरंगा वाटपाचा रौप्यमहोत्सव सुरू झाला आहे आणि या करता काश्मीर येथे एक हजार तिरंगा झेंडा पाठविण्यात आले. परिवर्तन संस्थेने गेल्या पंचवीस वर्षांमध्ये वेगवेगळ्या शाळा, महाविद्यालय आणिशासकीय कार्यालयांमधून झेंडे दिले आहेत. अनेक शासकीय कार्यालयात टेबल झेंडे दिले आहेत. आज देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त झेंडे पाठवताना परिवर्तन संस्थेला अतिशय अभिमान वाटत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading