fbpx

गायन-बासरीची जुगलबंदी आणि संतूराच्या सुरात रसिक मंत्रमुग्ध

पुणे : गायन आणि बासरीची सुरेल जुगलबंदी आणि उत्तरार्धात रंगलेले संतूरवादन ऐकण्यात रसिक मंत्रमुग्ध झाले. गायन वादनाची एक अनोखी सांगीतिक मैफल शनिवारी पुणेकरांनी अनुभविली.

प्रेरणा संगीत संस्था आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षण, सांगीतिक कार्यक्रम आणि कार्यशाळा यांच्या माध्यमातून संगीताचा प्रसार करणाऱ्या प्रेरणा संगीत संस्थेच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ही मैफल कोथरूड येथील यशवंराव चव्हाण नाट्यगृह येथे संपन्न झाली.
कार्यक्रमाची सुरवात जयपूर अत्रौली घराण्याच्या गायिका विदुषी सानिया पाटणकर यांचे गायन आणि ज्येष्ठ बासरीवादक अमर ओक यांच्या बासरीवादनाच्या जुगलबंदीने झाली. त्यांनी तंत अंग आणि गायकीच्या सरगम – तराणा बंदिशी यांचे एकत्र सादरीकरण आणि ‘जा जा रे अपने मंदिरवा’ ही बंदिश सादर केली.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संतूरवादक पद्मश्री पं. सतीश व्यास यांच्या संतूरवादनाने रसिकांचे जिंकली. त्यांनी राग रागेश्रीमध्ये आलाप विलंबित,मध्य आणि दृत् या तीन तालातील तीन बंदिशी रचना सादर केल्या. पहाडी धून रचनेच्या सादरीकरणाने त्यांनी कार्यक्रमाचा समारोप केला.
कार्यक्रमात प्रमुख कलाकारांना पं. रामदास पळसुले (तबला), रोहित मुजुमदार (तबला) आणि निरंजन लेले (हार्मोनियम ) या कलाकारांनी साथसंगत केली. मंजुषा गाडगीळ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: