fbpx

महाराष्ट्र बोर्डासाठी वीस टक्के प्रवेश क्षमता वाढविण्याची मागणी

पुणे : महाराष्ट्र बोर्डाचा निकाल लागल्यानंतर बी.ए., बी. कॉम.,बी.बी.ए. साठी प्रवेश झाले. महाविद्यालयांच्या शेवटच्या प्रवेश यादीचा कटऑफ देखील ८० टक्के च्या वर आहे. त्यामुळे ३५ टक्के ते ८० टक्के गुण मिळवलेले हजारो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. ८० टक्के पेक्षा अधिक गुण मिळून शिकण्याची इच्छा असूनही प्रवेशाअभावी अनेक विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय होण्याची भीती पालकांना व विद्यार्थ्यांना वाटत आहे. त्यामुळे सीबीएससी बोर्डाप्रमाणेच महाराष्ट्र बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी देखील २० टक्के प्रवेश क्षमता वाढवावी, अशी मागणी पुण्यातील विद्यार्थी चळवळीतील कार्यकर्त्यांच्यावतीने करण्यात आली आहे.

यासंबंधीचे निवेदन कार्यकर्त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांना दिले. यावेळी महाराष्ट्र नागरिक कृती समितीचे अध्यक्ष सुरेश अप्पा जैन, पुणे शहर काँग्रेसचे संघटक सचिव अभिजीत महामुनी, कला व सांस्कृतिक भाजप पुणेचे सरचिटणीस शैलेश बडदे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चिटणीस प्रशांत गांधी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष अजिंक्य पालकर, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष ऍड. सुरेश खुरपे, वंचित बहुजन आघाडीचे अतुल झोडगे, उल्हास अग्निहोत्री उपस्थित होते.

सुरेश अप्पा जैन म्हणाले, बारावी सीबीएससी बोर्ड आणि महाराष्ट्र बोर्डाचा निकाल लागल्याने महाविद्यालयांनी प्रवेश प्रक्रिया आधीच सुरू केली होती. बहुतांश महाविद्यालयातील प्रवेश संपलेले आहेत. प्रवेशासाठीचा कट ऑफ ८० टक्क्यांच्या वर आहे. त्यामुळे ३५ टक्के ते ८० टक्के गुण मिळवलेले हजारो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत.

या परिस्थितीचा सहानुभूतीने व गांभीर्याने विचार करून सीबीएससी बोर्डा सोबतच महाराष्ट्र बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठीही २० टक्के प्रवेश क्षमता वाढवावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: