fbpx

माजी महापौर नानासाहेब शितोळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिनेते वरूण भागवत यांच्या हस्ते वृक्षवाटप

पिंपरी  : सांगवीच्या विकासाचे शिल्पकार व पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी महापौर अरविंद उर्फ नानासाहेब शितोळे यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या वतीने वृक्षवाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्ञानेश्वर माऊली फेम अभिनेते वरूण भागवत आणि दिग्दर्शक नितीन वाघ यांच्या हस्ते नागरिकांना विविध प्रजातींच्या रोपांचे वाटप करण्यात आले.


यावेळी नानासाहेबांच्या पत्नी अनिता  शितोळे, उद्योजक अजय शितोळे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव, सचिव प्रणव राव, अशोक चव्हाण, ईश्वर चौधरी, चंद्रकांत चोपडे, संभाजी मनोकर, खान्देश मराठा मंडळाचे अध्यक्ष गुलाबराव पाटील, तनया राव, अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या तिन्ही विभागांच्या मुख्याध्यापिका पूजा पोटपल्लीवार, आशा घोरपडे व नीलम पवार, शिक्षकवृंद, पालक आदी उपस्थित होते.

अभिनेते वरुण भागवत आणि दिग्दर्शक नितीन वाघ म्हणाले, वृक्षारोपण ही काळाची गरज असून, संतांनीही वृक्षसंवर्धनाचे महत्त्व सांगितले आहे.जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी झाडे लावणे गरजेचे आहे. सांगवी परिसराचा विकास बघितल्यास नानासाहेब शितोळे यांची दूरदृष्टी लक्षात येते.
आरती राव यांनी प्रास्ताविक करताना नानासाहेबांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व उलगडून दाखवले. तसेच त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. प्रणव राव यांनी सांगितले, की नानासाहेब शितोळे यांना विविध खेळामध्ये आवड होती. त्यांचे खो-खो व कबड्डीमधील प्रावीण्य वाखाणण्याजोगे होते.
अतुल शितोळे म्हणाले, की नानासाहेब शितोळे यांनी राजकारण व समाजकारण यामध्ये समतोल राखला होता. पिंपरी चिंचवडच्या विकासात त्यांचा मोठा वाटा आहे.
दरम्यान, अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या वतीने नागरिकांना विविध प्रजातींच्या रोपांचे वाटप करण्यात आले. तसेच विद्यार्थ्याच्या विविध चित्रांचे प्रदर्शन, खो-खो सामने, निबंध लेखन आदी स्पर्धा घेण्यात आल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका स्मिता बर्गे व नीलम मेमाणे यांनी केले. भटू शिंदे, उदय फडतरे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: