fbpx

Pune : महाविकास आघाडीच्या २० नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश?

पुणे: शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यात सत्तांतर झाले.
त्यानंतर अनेक जण शिंदे गटात सहभागी होत असल्याच्या बातम्या दररोज येत आहे.त्याचेच पडसाद आता पुण्यात उमटण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीतील 18 ते 20 नगरसेवक भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात असल्याची खात्रीशीर माहिती समोर येत आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना भाजपचे 20 ते 22 नगरसेवक महाविकास आघाडीत जाणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र निवडणुका लांब पडल्याचा फायदा भाजपच्या पथ्यावर पडताना दिसतोय.

महाविकास आघाडीतील 18 ते 20 नगरसेवकांनी आपल्याला भाजपकडून उमेदवारी मिळू शकते का या दृष्टीने प्रयत्न सुरू केल्याची माहिती आहे. त्यासाठी या नगरसेवकांनी स्थानिक नेत्यांच्या माध्यमातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. ओबीसी आरक्षण लागू झाल्यानंतर होणाऱ्या बदलानंतर आपला निभाव लागावा यासाठी महाविकास आघाडीतील हे नेते प्रयत्न करत असल्याचे सांगितले जात आहे. ज्या नगरसेवकांनी भाजपशी संपर्क साधला त्यामध्ये सर्वाधिक काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आहेत. इतकेच काही तर काँग्रेसचा एक बडा नेता देखील भाजपशी जुळून घेण्याचा प्रयत्न आहे.
दरम्यान राज्यातील सत्तांतराचा सर्वाधिक फटका शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे. शिवसेनेतील काही नगरसेवक आणि पदाधिकारी शिंदे गटात जाण्याची शक्यता आहे. कारण आगामी महापालिका निवडणुकीत शिंदे सेनेला उमेदवारी देण्याचा प्रयत्न भाजपकडून होईल, अशी शक्यता आहे. त्यामुळे आपल्याला उमेदवारी मिळेल या आशेने अनेक जण शिंदे गटात प्रवेश करतील. आणि भाजपकडूनही शिवसेनेत फूट पाडली जाईल, अशी देखील शक्यता आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: