fbpx

३०० अल्पवयीन मुलांना पुन्हा घर ; लोहमार्ग पोलिसांच्या ‘निर्भया’ पथकाची कामगिरी

मुंबई : घरातून पळून आलेल्या आणि रेल्वे हद्दीत सापडलेल्या, तसेच रेल्वे हद्दीतून अपहरण झालेल्या ३०० अल्पवयीन मुला-मुलींची जूनमध्ये घरवापसी करण्यात लोहमार्ग पोलिसांच्या महिला कर्मचाऱ्यांच्या ‘निर्भया’ पथकाला यश आले. तसेच तीन अपहरण प्रकरणांतील आरोपींना पकडण्यात आल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली.

कुटुंबीयांबरोबर झालेला वाद, अभ्यासाचा ताण, शहराची तसेच रेल्वे स्थानक पाहण्याची ओढ, चित्रपट अभिनेत्यांच्या भेटीसाठी प्रयत्न अशा विविध कारणांमुळे अल्पवयीन मुले घरातून पलायन करतात आणि रेल्वे स्थानके गाठतात. त्यामुळे पश्चिम आणि मध्य रेल्वे उपनगरीय स्थानकात अशी अल्पवयीन मुले सापडण्याचे प्रमाण अधिक आहे. याबाबत माहिती मिळताच अथवा संशयित वाटल्यास रेल्वे पोलीस त्यांना ताब्यात घेतात. तसेच सामाजिक संस्थेच्या मदतीने आवश्यक ती कार्यवाही करून, कुटुंबीयांचा शोध घेऊन मुलांना त्यांच्या स्वाधीन करण्यात येते.

लोहमार्ग पोलिसांच्या महिला कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या ‘निर्भया’ पथकाला सुमारे ३०० प्रकरणांतील मुला-मुलींना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात यश आले आहे. यामध्ये लोहमार्ग पोलीस ठाण्यात सर्व प्रक्रिया पूर्ण करून १३४ अल्पवयीन मुलांना पालकांच्या ताब्यात दिले. तर १६३ मुलांना बालगृह आणि महिला सुधारगृहात पाठविण्यात आले होते.

आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर या मुलांना पालकांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तर रेल्वे हद्दीतूनच अपहरण झालेल्या प्रकरणांचाही तपास निर्भया पथकाकडून करण्यात आला असून या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: