Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

काळू धरणाच्या कामांना गती देण्यासाठी ३३६ कोटींचा निधी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ठाणे जिल्ह्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन जिल्ह्याला पुरेसा पाणी पुरवठा करण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या काळू धरणाच्या कामांना गती देण्यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने 336 कोटी निधी भूसंपादनासाठी उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. कल्याण मंडणगड-कुशिवली धरणाचे काम वेगाने पूर्ण करावे अशी मागणी यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली.

सह्याद्री अतिथीगृहात ठाणे जिल्ह्यातील पाणी प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. या बैठकीस राज्याचे मुख्य सचिव  मनु कुमार श्रीवास्तव, अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, नगर विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास, ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा, ठाणेचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अनबल्गन, खा. डॉ श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र फाटक यांसह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ठाणे जिल्ह्यातील काळू धरणाच्या उभारणीसाठी मुरबाड तालुक्यातील 12 ग्रामपंचायतीतील 18 गावे आणि 23 पाड्यांची जमीन अधिग्रहित केली जाणार आहे. तसेच वन विभागाची 999 हेक्टर जमीनही या धरणामुळे पाण्याखाली जाणार आहे. या सर्वं  जमिनीच्या भूसंपादनासाठी  एमएमआरडीएने पहिल्या टप्प्यात 336 कोटी रुपये उपलब्ध करून द्यावेत. ज्यायोगे भूसंपादन विहित वेळेत पूर्ण होऊन धरणाच्या कामाला गती येईल असेही मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

काळू धरणातून 1140 दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. या धरणाच्या उभारणीमुळे ठाणे, भिवंडी निजामपूर, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर महापालिका, अंबरनाथ आणि कुळगाव-बदलापूर नगरपालिका या शहरांची भविष्यातील पाण्याची तहान भागवली जाईल असा विश्वासही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

एमआयडीसीच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्याचा दाब वाढवण्याची सूचनादेखील मुख्यमंत्र्यांनी एमआयडीसीला केली. येत्या काही दिवसात हा प्रश्न सोडविण्यात येईल असे एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अनबल्गन यांनी स्पष्ट केले.

जांभूळ धरणातून शहाड शहराला पाणीपुरवठा होतो, या पाणीपुरवठा वाहिन्या अतिशय जीर्ण झाल्या असून, त्यातून मोठ्या प्रमाणावर पाणीगळती होते या वाहिन्या तातडीने बदलण्याची मागणी यावेळी केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading