पुढचे चार ते पाच दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात अतिवृष्टीची शक्यता
पुणे : राज्यात सुरु असलेली मुसळधार पावसाची संततधार सुरुच आहे. राज्याच्या विविध ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
दुसऱ्या बाजूला मुसळधार पावसामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य परिस्थिती आणि संकटाचा विचार करुन काही जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रामुख्याने मुंबईसह, ठणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे सातारा, कोल्हापुरात आदी जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 8 ते 12 जुलै या काळात रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
राज्यात पुढचे चार ते पाच दिवस अतिमहत्त्वाचे असणार आहेत. प्रामुख्याने कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात अतिवृष्टीची शक्यता आहे. या शिवाय मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात प्रशासनाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सध्या राज्याच्या विविध भागात चांगला पाऊस पडत आहे. मुंबईसह ठाणे, पालघर कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पावसानं चांगली हजेरी लावली आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातही पावसानं चांगली हजेरी लावली आहे.