महा एनजीओ फेडरेशनतर्फे महाराष्ट्रात ७५ ठिकाणी योग सप्ताह
पुणे : मानवी शरीर, ह्रदय, मन आणि आत्मा एकत्र करणारे योग हे एकमेव उत्तम माध्यम आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विविध शहरे व जिल्हयांतील ७५ सामाजिक संस्थांमधून महा एनजीओ फेडरेशनतर्फे योग सप्ताह साजरा करण्यात आला. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी (७५) वर्षानिमित्त व जागतिक योग दिनाच्या औचित्याने सुरु झालेल्या या उपक्रमाची सांगता सप्ताहपूर्तीनंतर झाली. यामध्ये आदिवासी भागातील शाळेतील विद्यार्थी, महिलांसह युवा कार्यकर्त्यांनी देखील मोठया संख्येने सहभाग घेतला.
उपक्रमाची संकल्पना फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष शेखर मुंदडा यांची असून चंद्रकांत राठी यांनी या उपक्रमाला सहकार्य केले. पुण्यासह बुलढाणा, यवतमाळ, नांदेड, सातारा, जालना, नागपूर, जळगाव, अकोला, परभणी, लातूर, नंदुरबार, हिंगोली, गडचिरोली, बीड, कोल्हापूर, भंडारा, उस्मानाबाद, औरंगाबाद, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, चंद्रपूर येथील सामाजिक संस्थांचा सहभाग होता.
चंद्रकांत राठी म्हणाले, मानवी जीवनात योगाचे अनन्यसाधारण महत्व आहे. योगाभ्यासामुळे मानवी जीवनात शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक पातळीवर अनेक सकारात्मक बदल घडून येण्यास मदत होते. योग ही भारताची प्राचीन परंपरा आहे. प्रत्येकामध्ये असलेली सर्जनशीलता ही ध्यान, योग व सुदर्शनक्रियेद्वारे अभिव्यक्त होते. त्यामुळे योग हा माणसाला स्वत:च्या स्वभावाच्या देखील जवळ घेऊन जातो, असेही त्यांनी सांगितले.
शेखर मुंदडा म्हणाले, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र संघामध्ये योग दिन आंतरराष्ट्रीय पातळीवर संकल्पना मांडली. त्याला बहुसंख्य देशांनी पाठिंबा दिला. त्यामुळे जगभर हा योगदिन साजरा होतो. यावर्षी भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव असून स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अनेक कार्यक्रम सुरु आहेत. महा एनजीओ फेडरेशनने योग दिनाचे औचित्य साधून ७५ वर्षपूर्तीनिमित्त ७५ संस्थांमध्ये योग सप्ताह साजरा करण्याचा संकल्प केला. त्यामध्ये हजारो योगप्रेमींनी सहभाग नोंदविला आहे.
