शाश्वत प्रकल्पांसाठी ‘सीएसआर’ निधी महत्वाचा – पंकज शहा
पुणे : “गावखेड्यात चांगल्या सुविधा, शाश्वत प्रकल्प उभारण्यासाठी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) अंतर्गत मिळणारा निधी अत्यंत महत्वाचा असतो. त्यामुळे प्रकल्पाचा आराखडा करून हा निधी मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. रोटरी क्लब ऑफ पुणे सनराईजच्या माध्यमातून उभारलेल्या पीस पोलमुळे समाजात शांतता प्रस्थापित होण्यास मदत होईल,” असे मत रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१३१ चे प्रांतपाल पंकज शहा यांनी व्यक्त केले.
रोटरी क्लब ऑफ पुणे सनराईजतर्फे कोरेगाव भीमा येथील जगदंबा ऑटो कंपोनंट्सच्या परिसरात उभारलेल्या ‘पीसपोल’चे उद्घाटन पंकज शहा व रोटरी क्लब ऑफ पुणे सनराईजच्या अध्यक्षा डॉ. सिमरन जेठवानी यांच्या हस्ते झाले. त्यानंतर शहा यांनी क्लबच्या उपक्रमांचा आढावा घेतला. यावेळी सहायक प्रांतपाल महेश भागवत, सनराईज क्लबचे सचिव एस. एम. खान, सहसचिव गौरव जेठवानी, सहखजिनदार सचिन तलरेजा, संचालक रवी पटोडीया, सुरेश जेठवानी, राजू शहा, नियोजित अध्यक्ष अलीअसगर मुख्तियार, मोहम्मद मुख्तियार, मेघा गणेरीवाला, रोहित जेठवानी, ‘इंटरॅक्ट’चे अध्यक्ष सुरज परदेशी आदी उपस्थित होते.
पंकज शहा म्हणाले, “गेल्या वर्षभरात सनराईज क्लबने उत्तम काम केले आहे. डॉ. सिमरन जेठवानी यांच्या नेतृत्वात महिला, युवक यांच्यासह आरोग्य, शिक्षण, पर्यावरण संवर्धन आदी क्षेत्रात परिणामकारक प्रकल्प व उपक्रम राबवले आहेत. पुढील कमिटीनेही अशाच स्वरूपाचे भरीव काम करावे. रोटेरियन असल्याचा अभिमान बाळगावा तसेच याचा उपयोग सामाजिक कार्यासाठी करावा.”
डॉ. सिमरन जेठवानी यांनी वर्षभरात राबवलेल्या उपक्रमांची माहिती दिली. महेश भागवत यांनीही क्लबच्या उपक्रमांचे कौतुक केले. गौरव जेठवानी यांनी प्रास्ताविक केले. अलीअसगर मुख्तियार यांनी आभार मानले.
