दिवाळी अंक मराठी माणसाचा मानबिंदू : भारत सासणे
मसाप दिवाळी अंक स्पर्धेचे पारितोषिक वितरण
पुणे : दिवाळी अंकांनी अनेक लेखकांना घडविले. दिवाळी अंकामुळे अनेक साहित्यप्रकार समृद्ध झाले. उत्तम दिवाळी अंकांनी कलाभान आणि विचारधन दिले. वाचकांची अभिरुची समृद्ध केली . दिवाळी अंक मराठी माणसाचा मानबिंदू आहे. असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या दिवाळी अंक स्पर्धेचे (२०२१) पारितोषिक वितरण त्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, दिवाळी अंक स्पर्धेचे समन्वयक वि. दा. पिंगळे उपस्थित होते.
या स्पर्धेत उत्कृष्ट दिवाळी अंकासाठीचे अ. स. गोखले स्मृतिप्रीत्यर्थ ‘रत्नाकर पारितोषिक’ ‘लोकमत’ या दिवाळी अंकाला, चंद्रकांत शेवाळे पुरस्कृत ‘विविध ज्ञानविस्तारकर्ते रावसाहेब मोरमकर पारितोषिक ‘शब्दालय’ या दिवाळी अंकाला, ‘मासिक मनोरंजनकार का. र. मित्र पारितोषिक’ ‘अक्षरदान’ या दिवाळी अंकाला, ‘शं. वा. किर्लोस्कर पारितोषिक’ ‘सृजनसंवाद’ या दिवाळी अंकाला, डेलिहंट पुरस्कृत उत्कृष्ट ऑनलाईन दिवाळी अंकाचे पारितोषिक ‘गोदातीर्थ दिवाळी इ-विशेषांक’ या दिवाळी अंकाला देण्यात आले. ‘जानकीबाई केळकर’ स्मृतिप्रीत्यर्थ ‘उत्कृष्ट बालवाङ्मयदिवाळी अंकाचे पारितोषिक’ ‘निर्मळ रानवारा’ या दिवाळी अंकाला तसेच दिवाळी अंकातील उत्कृष्ट कथेसाठीचे ‘दि. अ. सोनटक्के पारितोषिक’ ‘आकांक्षा’ या दिवाळी अंकातील रवींद्र लाखे यांच्या ‘दृश्याला रेषा नसतात’ या कथेला तसेच उत्कृष्ट ललित लेखासाठीचे ‘अनंत काणेकर पारितोषिक’ ‘कृष्णाकाठ’ या दिवाळी अंकातील वर्षा काळे यांच्या ‘छम छम!!!’ या लेखाला देण्यात आले. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ. संगीता बर्वे, मनोहर सोनवणे आणि मंजिरी बोन्द्रे यांनी काम पाहिले.
प्रा जोशी म्हणाले, “कोरोनाच्या विश्वव्यापी संकटातही जीव धोक्यात घालून आणि आर्थिक तोटा सहन करून ११३ वर्षांची समृद्ध परंपरा खंडित होऊ नये म्हणून संपादकांनी दिवाळी अंक काढले ही अभिमानास्पद गोष्ट आहे. वाचकांनीही अंकाना उत्तम प्रतिसाद दिला. याची नोंद इतिहास घेईल. दिवाळी अंकांची संख्यात्मक वाढ होत असताना त्यांची वाङ्मयीन गुणवत्ता हा चिंतेचा विषय आहे. अनेक दिवाळी अंकात तेच ते लेखक वर्षानुवर्षे लिहित असल्यामुळे अंकांना साचलेपण आले आहे. अशा अंकांनी नव्या लेखकांचा शोध घेतला पाहिजे. दिवाळी अंकांना जाहिरातीच्या रूपाने आर्थिक मदत करणे हे समाजातील धनिकांना पूर्वी आपले सांस्कृतिक कर्तव्य वाटत होते. आज ती भावना राहिली नाही. वाचकांच्या अभिरुचीचा पोत बदलल्यामुळे त्यांना ललित साहित्याचा समावेश असलेल्या दिवाळी अंकांपेक्षा माहितीपर दिवाळी अंकांचे आकर्षण वाटते आहे.”
सुनीताराजे पवार यांनी आभार मानले. वि. दा. पिंगळे यांनी प्रास्ताविक केले. श्रीकांत चौगुले यांनी सूत्रसंचालन केले.
