fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNE

शांतता भंग होण्यासाठी आपण एकतरी शब्द उच्चारला पाहिजे : वसंत आबाजी डहाके

पुणे : स्पर्शातून आपल्या अस्तित्वाची जाणीव होत असते. पण हा स्पर्श हरवला आहे की काय अशी सध्या परिस्थिती निर्माण झाली आहे. अशाही परिस्थितीत प्रत्यक्ष वास्तव आणि कल्पना यातून लेखक, कवी, शोध घेत आहेत, वेध घेत आहेत. उद्विग्न, खिन्न होत आहेत. अशाही परिस्थितीत सुन्न करणारी शांतता ऐकू येते म्हणून लेखक बोलतो, आतडे पिळवटते म्हणून त्याला बोलावेसे, लिहावेसे वाटते. भ्रमयुगात आपण प्रवेश केला आहे असे सासणे लिहितात. यामागे अबोध दहशत, आतंक आहे. हे भय आपण अनुभवत असतो पण मान्य करीत नाही. शांतता भंग करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकतरी शब्द उच्चारला पाहिजे, अशी अपेक्षा ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांनी व्यक्त केली.

दक्षिणायनतर्फे लेखक का बोलतो? या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी डहाके अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक गणेश देवी, ज्येष्ठ पत्रकार, खासदार कुमार केतकर आणि प्रा. हरी नरके सहभागी झाले होते.

डहाके म्हणाले, आपण खरेच स्वस्थ राहू शकतो का, ही स्वस्थता किती काळ टिकून राहणार आहे की संपणार आहे हाही आपला भ्रमच आहे. अनेक जण भीतीपोटी बोलत नसतात. आपले काय होईल यापेक्षा आपल्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींचे काय होईल या काळजीपोटी सर्वसामन्य बोलत नाहीत. पर्याय नाही म्हणून माणसे स्वस्थ बसतात. सासणे यांनी त्यांच्या भाषणात मार्मिक आणि सूचकपणे काही प्रश्न उपस्थित केले आहेत. सासणे कदाचित पुढे पाहत आहेत, पुढील संकटांची चिन्हे त्यांना जाणवत असावीत म्हणून ते लिहित आहेत.

गणेश देवी म्हणाले, अभिव्यक्ती सैनिकांची नावे कुठे दिली जात नाहीत ही गोष्ट चिंताजनक आहेत. आपल्याला भ्रमामध्ये राहण्याचे वेड आहे, शौक आहे. समाज निद्रिस्त असणे हा चिंतेचा विषय आहे. निरागस लोकांना मृत्युदंडाची शिक्षा होऊ शकेल असे सध्याचे वातावरण आहे. 25 जूनला मोदींनी जर्मनीत आपलेच लोक जमवून भाषण केले त्यावेळी भारतात लोकशाही जिवंत आहे असे ठामपणे सांगितले गेले. त्याच दिवशी तिस्ता सेटलवाड यांना अटक होणे हा योगायोग आहे का? या वर्षी 25 जूनला आणीबाणी लागली हे म्हणायचे धाडस समाज करीत नाही ही निद्रा आहे की ही भ्रमयुगाची अवस्था आहे, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. तपास यंत्रणांवर ताबा मिळवून अटकसत्र सुरू आहे याची काही उदाहरणे देत सोनिया गांधी यांची प्रकृती ठिक नव्हती नाहीतर त्यांनाही अटक केली असती, असे त्यांनी सूचित केले.

समाज असंवेदनशील झाला आहे. समाजात अस्वस्थता शिल्लक नाही म्हणून साहित्य निर्मिती होत नसावी अशी टिप्पणी करून कुमार केतकर म्हणाले, अस्वस्थता का निर्माण होत नाही कारण मध्यमवर्गीयांत स्वास्थ्य आहे. मध्यमवर्ग जाणीवपूर्वक स्वास्थ्याचा विचार करीत आहे. इतिहासाला विस्मृतीत घालण्याचा हा काळ आहे. अस्वस्थ समाजाकडे पाहायचे नाही, स्वातंत्र्य चळवळीला विसरायचे आहे अशी मानसिकता तयार झाली आहे. पाठ्यपुस्तकातील इतिहास बदलत चालला आहे. इतिहासातून गांधी-नेहरू लुप्त होत आहेत. आणीबाणी काळानंतर खोटे नायक निर्माण केले जात आहेत. आजूबाजूची अस्वस्थता, सत्यता दिसू नये म्हणून प्रयत्न चालू आहेत.

प्रा. हरी नरके म्हणाले, सत्य आणि नैतिकतेचा आग्रह धरणे हे लेखकाचे कर्तव्य आहे. सामान्य माणसाच्या मनात भीती, दहशत आहे. शिक्षणाच्या माध्यमातून इतिहासाशी नाळ तोडण्याचे, ध्येय-उद्दिष्टांपासून दूर नेण्याचे काम सुरू आहे. समाजमाध्यमातून व्यक्त झाले तर यंत्रणांची भीती आहे. भारतीय संविधानाला धोका निर्माण झाला आहे. संस्कृत ही भाषांची जननी आहे हा चुकीचा प्रचार केला जात आहे. जातीनिर्मूलन या मुद्द्याला अग्रक्रम दिला जात नाही. जातींबद्दल बोलले नाही म्हणजे जाती गेल्या असा समज पसरवला जात आहे. लोकशाहीबरोबर हिंदुत्व राहू शकत नाही, हिंदुत्व लोकशाहीचा शत्रू आहे हा बाबासाहेब आंबेडकर यांनी 1946 साली दिलेला इशारा आज वास्तवात येत असल्याचे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदेश भंडारे यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading