fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNE

रस्ता सुरक्षा ही सर्वांची जबाबदारी – पोलीस उपअधीक्षक प्रीतम कुमार यावलकर

पुणे  : वाढत्या अपघातास आळा बसावा यासाठी वाहतूक नियमांचे पालन प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. रस्ता सुरक्षा ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन पोलीस उपअधीक्षक प्रीतम कुमार यावलकर केले.

पुणे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित रस्ते सुरक्षा विषयक कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे, यशदातील अधिकारी डॉ. सुनील धापटे, रस्ते विषयक मार्गदर्शक स्वाती शिंदे, संदीप गायकवाड, जेष्ठ संपादक जयप्रकाश प्रधान उपस्थित होते.

उपअधीक्षक यावलकर म्हणाले, रस्त्यावर होणाऱ्या अपघातग्रस्तांना वेळीच मदत मिळाली तर एखाद्याचा जीव वाचू शकतो. यासाठी मृत्युंजय दूत योजना सुरू करण्यात आली आहे. अपघातग्रस्तांना वेळेवर उपचार मिळाले तर अपघातग्रस्तांचा जीव वाचवला जाईल. महामार्ग मृत्युंजय योजनेअंतर्गत महामार्गावरील पाच व्यक्तींचा एक समूह तयार करून त्यांना ओळखपत्र व एक स्टेचर आणि प्रथम उपचार किट देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ससाणे म्हणाले, देशात अपघात कमी करण्याच्या उपाययोजना राबविण्यासाठी देशपातळीवर रस्ते सुरक्षा परिषद तसेच राज्य पातळीवर राज्य रस्ते सुरक्षा परिषद स्थापन करण्यात आली आहे. परिषदेच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच वरिष्ठ खासदार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरावर रस्ते सुरक्षा समित्या कार्यरत आहे. जिल्ह्यातील विविध विभाग, वाहने, आरोग्यव्यवस्था, शिक्षण तसेच रस्ते सुरक्षेशी सबंधित विविध विभाग तसेच या क्षेत्रात कार्यरत स्वंयसेवी संस्था यांनी एकत्रितपणे काम करण्यासाठी आजच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

यशदाचे अधिकारी डॉ. धापटे यांनी रस्त्यावर शिस्त वाढली की अपघात निश्चितपणे कमी होतील, असे सांगितले. तसेच पुणे शहरातील विविध उपक्रमाबाबत त्यांनी माहिती दिली. यावेळी अभियंता राजेश कुमार सराफ, परिसर संस्थेचे संदीप गायकवाड, ई लर्निंगच्या योगिता कुलकर्णी, गोविंदराव पानसरे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यशाळेला विविध विभागाचे प्रमुख अधिकारी, तसेच रस्ते अपघात विषयक काम करणाऱ्या संस्थांचे प्रमुख उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading