Pune – पाऊस गायब असल्याने पाणीकपातीची शक्यता
पुणे : अत्यंत अपुरा पाऊस, खडकवासला धरणसाखळीत कमी झालेला पाणीसाठा यामुळे पुणे शहरात पाणीकपातीची शक्यता आहे. शहरात साधारणत: जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून मान्सून सुरू होतो. यंदा मान्सून वेळेत आला असला, तरी पावसाने अजिबात जोर धरलेला नाही. आतापर्यंत पुण्यात केवळ ३३.८ मिलिमीटर पाऊस झाला आहे.
खडकवासला प्रकल्प साखळीत फक्त २.७६ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा शिल्लक आहे. पुण्याला दररोज १६८५ दशलक्ष घनमीटर (एमएलडी) पाणी पुरवण्यात येते. पावसाने आणखी काही काळ ओढ दिल्यास अंदाजे दीड ते दोन महिने पुरेल इतकाच पाणीसाठा असल्याने चिंताजनक स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी पाणीपुरवठा विभागप्रमुखांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शिवाजीनगर येथील भारतीय हवामानशास्त्र विभागाला भेट देऊन पावसासंदर्भात माहिती घेतली.
खडकवासला धरणसाखळीत फक्त २.७६ टीएमसी पाणीसाठी शिल्लक आहे. दर वर्षी उन्हाळ्यात शेतीसाठी एक आवर्तन घेतले जाते. यंदा मात्र मे महिन्यात दोन आवर्तने घेतली गेली. त्याद्वारे सात टीएमसी पाणी शेतीसाठी सोडले गेले. अतिरिक्त आवर्तनामुळे ३.५ टीएमसी पाणी कमी झाले.
करोनाच्या साथीपूर्वी महापालिकेतर्फे दररोज १२२५ एमएलडी पाणीपुरवठा केला जात होता. नियमाप्रमाणे हद्दीलगतच्या गावांनाही पालिकेतर्फे पाणीपुरवठा केला जात होता. सध्या पालिकेतर्फे दररोज १६८५ एमएलडी पाणीपुरवठा केला जात आहे. तरीही शहराच्या काही भागांसह उपनगरांत पाणीटंचाई आहे. त्यामुळे पालिकेला भामा आसखेड धरणातून दीड ते दोन टीएमसी तर खडकवासला धरणातून तीन टीएमसी पाणी अतिरिक्त घ्यावे लागत आहे.
