सलग १२ तास अखंड कीर्तनमालेने वारकरी भक्तांचे स्वागत

पुणे : वारकरी सांप्रदायाचा भगवा पताका आसमंती उंचवत, ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात पंढरपूरला पायी चालत जाणा-या वारक-यांच्या स्वागतासाठी पुण्यात सलग १२ तास अखंड कीर्तनमालेचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त युवा कीर्तनकारांची अखंड कीर्तनमाला कसबा पेठेतील लालमहाल येथे उत्साहात पार पडली. वारकरी भक्तांनी या कीर्तनमालेला उर्त्स्फूत प्रतिसाद दिला.

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी व पुणे पीपल्स को-आॅप. बँकेतर्फे वै.ह.भ.प. महाराष्ट्र शाहीर जंगम स्वामी यांच्या स्मरणार्थ सलग १२ तास अखंड कीर्तनमालेचे आयोजन करण्यात आले होते. कीर्तनमालेचे उद््घाटन लालमहालाचे रखवालदार गिरीश कटारे, पुणे मनपा आरोग्य विभागाचे स्वच्छता दूत चंद्रमणी कांबळे यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजक प्रबोधिनीचे अध्यक्ष आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे, प्रा.संगीता मावळे आदी उपस्थित होते.

युवा कीर्तनकार ह.भ.प. श्रेयस बडवे, रेशीम खेडकर, सिद्धी कुलकर्णी, ज्ञानदा बुरसे, मंदार गोखले, विकास दिग्रजकर, निहाल खांबेटे, होनराज मावळे यांनी कीर्तन केले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त कीर्तनकारांनी क्रांतिकारक व स्वातंत्र्य चळवळीतील राष्ट्रपुरुषांविषयी कीर्तन केले. मुकुंद कोंडे, सिद्धार्थ कुंभोजकर, शुभम उभे यांनी साथसंगत केली. अक्षदा इनामदार हिने सूत्रसंचालन केले.

हेमंत मावळे म्हणाले, टाळ-मृदुंगाच्या गजरात संतांच्या पालख्या देहू-आळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान करतात आणि पुण्यात मुक्कामासाठी थांबतात. मुक्कामाच्या दिवशी देखील वारकरींच्या स्वागतासाठी पुणेकरांची जयत्त तयारी सुरू असते. त्यामुळे प्रबोधिनीतर्फे वेगळ्या प्रकारे वारक-यांचे स्वागत करीत त्यांना नारदीय कीर्तनाचा आनंद देण्याचा प्रयत्न कीर्तनमालेच्या माध्यमातून दरवर्षी केला जातो. हजारो वारकरी, दिंडीप्रमुख या कीर्तनमालेचा आनंद घेण्याकरीता लालमहालात येतात.

 

Leave a Reply

%d bloggers like this: