fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNE

लाखो विठ्ठल भक्तांसह ‘फिनोलेक्स इंडस्ट्रीज’ही पंढरीच्या वारीमध्ये सहभागी

पुणे : ज्येष्ठ महिना मावळतीला आला आहे आणि आषाढाची, त्यातही पंढरीच्या वारीची चाहूल लागली आहे. विठ्ठलाच्या लाखो भक्तांची ती यात्रा, ते मेळे, त्या दिंड्या, त्यांची ती भजने, रिंगण, आनंदाने नाचणे, तो टाळ-चिपळ्यांचा व मृदुंगाचा नाद या सगळ्यांनी भारून जाण्याचे दिवस जवळ आले आहेत. भगवे ध्वज आणि चंदनाचा सुगंध यांनी वातावरण-निर्मिती झालेली आहे. संतांनी श्रीविठ्ठलाला भेटण्याची ही ८०० वर्षांची परंपरा, संतांच्या पालख्यांचा हा प्रवास प्रत्येक वारकऱ्याच्या हृदयात, त्याच्या घामात, नामाचा जप करण्यात आणि भजनात पुन्हा नव्याने जिवंत होणार आहे.

दरवर्षी महाराष्ट्रभरातील लाखो भाविक पंढरपूरच्या विठोबा मंदिरात एकादशीला पोहोचण्यासाठी २१ दिवसांची पायी यात्रा करतात. या मिरवणुकीला वारी आणि या भक्तांना वारकरी म्हणतात. ही ८०० वर्षे जुनी परंपरा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे.

गेल्या अनेक दशकांप्रमाणे, फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी या वर्षीही या अद्भुत मानवी आणि आध्यात्मिक अनुभवात सहभागी होत आहे. वारीमध्ये सहभागी होणाऱ्यांना अपूर्व आनंद मिळतो, परंतु त्याचबरोबर त्यांना उन्हा-पावसाचा त्रासही होतो. प्रत्येक वारकऱ्याकडे काही सामान, एक लहान वाद्य, तुळशीचे रोप किंवा विठ्ठलाची मूर्ती असते. फिनोलेक्स या वारकऱ्यांना आणि संपूर्ण वारीवर देखरेख करणार्‍या हजारो पोलिसांना रेनकोट आणि सोयीस्कर अशा पिशव्या यांसारख्या आवश्यक गोष्टी पुरवून हा प्रवास थोडा आरामदायी करीत असते.

याशिवाय, ‘फिनोलेक्स’ची सीएसआर शाखा असलेली मुकुल माधव फाउंडेशन ही संस्था यात्रेच्या विविध महत्त्वाच्या ठिकाणी सुमारे १० वैद्यकीय शिबिरे आयोजित करीत आहे. पुण्यातील अनेक रुग्णालयांनी या सेवेमध्ये ‘एमएमएफ’ला सहकार्य केले आहे.

या उपक्रमावर भाष्य करताना ‘फिनोलेक्स इंडस्ट्रीज लि.’चे सेल्स आणि मार्केटिंग विभागाचे प्रेसिडेंट प्रदीप शास्त्री वेदुला म्हणाले, “गेल्या ४० वर्षांमध्ये फिनोलेक्सची उत्पादने देशातील प्रत्येक राज्यात लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचली. ‘फिनोलेक्स’ने सर्वांना सेवा दिली. त्यामुळे पीव्हीसी पाईप उद्योगातील काही महत्त्वाच्या राष्ट्रीय कंपन्यांमध्ये आमची गणना होते. महाराष्ट्र हे आमच्या कंपनीचे जन्मस्थान आहे आणि त्यामुळेच पंढरपूरच्या वारीचे आम्हाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या अनोख्या खास परंपरेशी निगडीत राहणे हा आमचा विशेष विशेषाधिकार आणि सन्मानही आहे.”

‘फिनोलेक्स’ला अर्थातच परंपरेची ताकद कळते. भारतातील सर्वात मोठा आणि एकमेव बॅकवर्ड इंटिग्रेटेड असा पीव्हीसीचा एकात्मिक उत्पादक असलेला हा ब्रॅंड आज कृषी, प्लंबिंग आणि सॅनिटेशन या क्षेत्रांमध्ये बाजारपेठेतील प्रबळ नेता बनला आहे. विश्वास, गुणवत्ता या पारंपारिक मूल्यांची काळजीपूर्वक जोपासना करून आणि आपल्या शेकडो वितरकांना, हजारो रिटेलर्सना व लाखो ग्राहकांना सेवा देऊन या ब्रॅंडने हा बहुमान कमावला आहे.

“पंढरपूरची वारी ही केवळ आध्यात्मिक यात्रा नाही, ही एक सामुदायिक सृजनशक्ती आहे. वारीच्या या प्रवासात जात, धर्म, लिंग किंवा सामाजिक-आर्थिक स्थितीचा विचार न करता लोक एकत्र प्रवास करतात, खातात, झोपतात. या मूल्यांवरच आमचा ठाम विश्वास आहे. मुकुल माधव फाऊंडेशन या आपल्या सीएसआर संस्थेच्या माध्यमातून ‘फिनोलेक्स इंडस्ट्रीज’ने समानता, सशक्तीकरण, आरोग्यसेवा आणि शिक्षण या क्षेत्रांमध्ये अथक परिश्रम घेतले आहेत. ज्या समुदायांमध्ये आम्ही कार्यरत आहोत, त्यांना सशक्त करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत,” असे वेदुला यांनी नमूद केले.

पहिला पाऊस सुरू झाला आहे. ओल्या मातीचा सुगंध राज्यभरातील नागरिकांना मंत्रमुग्ध करीत आहे. आणि अर्थातच, वारकऱ्यांच्या पावलांना लागणारी पंढरीची माती ही त्यांच्यासाठी एक दैवी सुगंध घेऊन येणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading