उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्टतर्फे तालतपस्वी पं. मधुकर कोठारे स्मृती उत्तुंग संगीत शिष्यवृत्तीची घोषणा
पुणे – भारताच्या ऐतिहासिक आणि कालातीत गुरू-शिष्य परंपरेचा वारसा अव्याहतपणे सुरू राहावा, आश्वासक युवा कलावंतांना कलोपासनेसाठी प्रोत्साहन मिळत राहावे या उद्देशाने तसेच भारतीय अभिजात कला आणि संस्कृती संवर्धनासाठी पुण्यासह मुंबई-ठाणे येथे 25 वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्टतर्फे तालतपस्वी कै. पं. मधुकर कोठारे (लंडन) स्मृती उत्तुंग संगीत शिष्यवृत्तीची घोषणा करण्यात आली आहे.
या वर्षीच्या शिष्यवृत्तीसाठी पद्मश्री तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांचे शिष्य ईशान परांजपे (तबला), रोहित खवळे (पखवाज) आणि शास्त्रीय गायक, संगीतकार पं. हेमंत पेंडसे यांचे शिष्य तेजस मेस्त्री (शास्त्रीय गायन) यांना देण्यात येणार आहे. प्रत्येकी 20 हजार रुपये रोख आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
अभिजात भारतीय शास्त्रीय संगीत, नृत्य आणि तबलावादन या कलांमध्ये गुरुकुल पद्धतीने सातत्याने विद्यादान करणाऱ्या ज्येष्ठ गुरुंच्या शिफारसीद्वारे त्यांच्या पसंतीस प्राप्त ठरणाऱ्या युवा आणि गरजू विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते.
शिष्यवृत्ती प्रदान सोहळा शनिवार, दि. 25 जून 2022 रोजी सायंकाळी 5:30 वाजता एमईएस सभागृह, मयूर कॉलनी, कोथरूड येथे होणार असून कार्यक्रमास पं. विजय कोपरकर प्रमुख पाहुणे तसेच पद्मश्री तालयोगी पं. सुरेश तळवलकर, पं. हेमंत पेंडसे विशेष अथिती म्हणून उपस्थित असणार आहेत.
