छत्रपती शिवाजी महाराज क्रांतिकारकांचे आदर्श : हभप मोरेश्वर जोशी-चऱ्होलीकर महाराज
पुणे : देशाला माता मानण्याची संस्कृती भारताव्यतिरिक्त जगात कोठेही नाही. मातृभूमीसाठी प्राणार्पण करण्याची शिकवण आपल्या देशातच दिली जाते. देश पारतंत्र्यात असताना अनेक क्रांतिकारांनी स्वत:च्या घरावर तुळशीपत्र ठेवून स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला आणि देशासाठी बलिदान दिले. देशासाठी बलिदान देणाऱ्या प्रत्येक क्रांतिकारांचे छत्रपती शिवाजी महाराज आदर्श होते, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार हभप मोरेश्वर जोशी-चऱ्होलीकर महाराज यांनी केले.
देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त श्रीमहागणेश अधिष्ठान विश्वस्त न्यास आणि शिवतीर्थनगर श्रीगणपती मंदिर ट्रस्टतर्फे सात दिवसीय क्रांतिकारक चरित्र कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कीर्तन महोत्सवाचा शुभारंभ जोशी-चऱ्होलीकर महाराज यांच्या कीर्तनाने झाला.
राष्ट्रधर्म जागरण अभियानाअंतर्गत क्रांतिकारक वाच्छिवायन अय्यर यांच्या देशकार्याची ओळख त्यांनी या वेळी करून दिली. जोशी-चऱ्होलीकर महाराज म्हणाले, संपूर्ण जगाला मार्गदर्शक ठरणारा इतिहास आजच्या काळात शिकविला जात नाही. आपली पुढील पिढी अयोग्य संकल्पनांच्या आहारी जाऊन पाश्चात्यांचे अंधानुकरण करीत अयोग्य मार्गावर जात आहे, त्यांना भारतीय संस्कृतीचा विसर पडला आहे. सद्यस्थितीत भारतावर आणि भारतीय जनतेवर सर्वच बाजूंनी शैक्षणिक, सांस्कृतिक अतिक्रमण होत असताना शिक्षकांनी कर्तव्यभावनेतून नवीन पिढीला क्रांतिकारकांचा इतिहास माहिती करून द्यावा. तसेच क्रांतिकारांचे विचार, साहित्य या पिढीपर्यंत पोहोचवून योग्य मार्गदर्शन करावे. जोशी-चऱ्होलीकर महाराजांना रंगनाथ कुलकर्णी (तबला) आणि माधव फळणीकर (संवादिनी) साथसंगत केली.
शिवतीर्थनगर श्रीगणपती मंदिर ट्रस्टचे शशिकांत सुतार प्रास्ताविकात म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यात क्रांतिकारकांचे योगदान खूप मोठे आहे. अनेक क्रांतिकारकांनी स्वातंत्र्य लढ्यात बलिदान दिले आहे. क्रांतिकारकांचा इतिहास खूप मोठा असून त्यांचे स्मरण करणे आवश्यक आहे. या हेतूने क्रांतिकारक चरित्र कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बळीराम कदम यांनी केले.
