Monday, June 15, 2026
Latest NewsPUNE

दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या वतीने ससून रुग्णालयाला चपाती मशिन भेट

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने ससून रुग्णालयातील किचन विभागाला अत्याधुनिक चपाती मशिन भेट देण्यात आले आहे. अवघ्या तीन तासात तब्बल ३ हजारहून अधिक चपात्या या मशिनद्वारे तयार होणार आहेत. आजमितीस ससून रुग्णालयात दिवसाला १२९६ रुग्णांना दोन्ही वेळेचे सकस जेवण विनामूल्य उपलब्ध दिले जात असून दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या सहकार्याने ससून रुग्णालय ही सेवा अखंडपणे देत आहे.

राजाराम अंबाजी मराठे व सुमती राजाराम मराठे यांच्या स्मरणार्थ गणेशभक्त सतीश मराठे यांच्या पुढाकाराने हे मशिन देण्यात आले आहे. चपाती मशिनचे पूजन करुन या मशिनच्या प्रत्यक्ष वापराला नुकतीच सुरुवात झाली. यावेळी देणगीदार सतिश मराठे, ससूनचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे, ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी, अक्षय गोडसे, अमोल केदारी, ससूनचे डॉ.हरिष ताटीया, डॉ.उषा निकुंभ, मुख्य आहारतज्ञ स्वाती बरेकर, चैताली शिंपले, आदी उपस्थित होते. जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत हा उपक्रम राबविला जात आहे.

डॉ.विनायक काळे म्हणाले, मशिनवर चपाती तयार होत असल्याने मानवी हस्तक्षेप कमी होत आहे. दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या पुढाकाराने यापूर्वी देखील चपाती मशिन किचन करिता मिळाले होते. आता तीन मशिन किचनमध्ये कार्यरत आहेत. मशिनवर चपात्या तयार होत असल्याने स्वच्छता राखण्यास आणखी मदत होत आहे. तसेच भोजनाची गुणवत्ता देखील उत्तम दिली जात आहे.

रुग्णालयातील १२९६ रुग्णांना दररोज दोन्ही वेळेचे भोजन याप्रमाणे दररोज सुमारे ३ हजार जणांना भोजन, चहा, नाश्ता दिले जाते. याकरिता एकूण २४ स्वयंपाकी व सहाय्यक कार्यरत असून उत्तम व सकस भोजन सेवा विनामूल्य देणे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या खंबीर पाठिंब्यामुळे शक्य होत आहे. सन २०१३ पासून हा प्रकल्प आजपर्यंत अखंडपणे सुरु असून हजारो रुग्णांनी याचा लाभ घेतला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading