राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत विजेपद पटकाविलेल्या माई बालभवनच्या अंध मुलींचा सत्कार
याबाबत हिंदू महिला सभेच्या अध्यक्ष सुप्रिया दामले म्हणाल्या, “ राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत माई बालभवन’च्या मुलींनी मिळविलेले यश खरोखरच कौतुकास्पद आहे. कोणताही मैदानी, समूह खेळ असो तो खेळताना संघातील तुमच्या सहकाऱ्यांसोबत योग्य समन्वय साधण्यासाठी ‘आय कॉन्टॅक्ट’ असणे गरजेचे असते. त्याशिवाय तुमच्या सहकाऱ्यांसोबत ताळमेळ साधणे अशक्य असते. मात्र या मुलींनी ती अशक्य गोष्ट साध्य करून दाखविली. त्यांनी हे नेमके कसे साध्य केले ? असे मी त्यांच्या प्रशिक्षकांना विचारले असता, ते म्हणाले, “ दृष्टीहीन खेळाडूंसाठी विशेष फूटबॉल असतो ,ज्यामध्ये घुंगरू असतात. त्या आवाजाच्या आधारे खेळाडूंना दिशा ओळखणे शक्य होते. त्याचबरोबर हे खेळाडू सतत ” वॉय ” असा आवाज करत असतात. त्याद्वारे आपला जवळचा खेळाडू आपल्या संघातील आहे, की प्रतिस्पर्धी संघातील आहे हे ते ओळखू शकतात. त्यामुळे त्यांना समन्वय साधणे शक्य होते.”
हे ऐकून या मुलीबद्द्ल असलेला अभिमान आणखी वाढला. त्यांना या स्पर्धेसाठी आधी स्वत: डोळ्यांवर पट्टी बांधून, अंध खेळाडूंची स्थिती समजून घेत, त्यांना प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक यांचाही मुलींच्या यशामध्ये मोठा वाटा आहे. त्यामुळेच आम्ही संस्थेतर्फे मुलींचा आणि त्यांच्या प्रशिक्षकांचा सत्कार करण्याचे निश्चित केले होते.’’
