९ व्या भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत महोत्सवा’स प्रारंभ
पुणे : कलाश्री संगीत मंडळ आणि द औंध सोशल फौंउडेशनचे अध्यक्ष अभिजीत गायकवाड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय ‘९ व्या भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत महोत्सवा’स शनिवारी औंध येथील पंडित भीमसेन जोशी कलामंदिर येथे प्रारंभ झाला. महोत्सवाचे उदघाटन शिवाजीनगर मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते झाले.
महोत्सवाच्या सुरवातीस राधानंद संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे तबला वादन आणि कलाश्री संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गायन सादर केले. त्यानंतर आमदार शिरोळे, पं. भीमसेन जोशी यांचे पुत्र आणि शिष्य श्रीनिवास जोशी, द औंध सोशल फौंउडेशनचे अध्यक्ष अभिजीत गायकवाड, कलाश्री संगीत मंडळाचे अध्यक्ष सुधाकर चव्हाण, ज्येष्ठ साहित्यिक दीपक चैतन्य, मंडळाच्या कोअर कमिटीचे सदस्य समीर महाजन, दत्तात्रय गायकवाड यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर मानसी कुलकर्णी यांनी राग पूर्वीमध्ये ‘पिहरवा की बासे’ विलंबित झुमरा आणि ‘कगवा बोले मोरी अटरिया’ ही बंदिश तीन तालात सादर केले. त्यांनी सादर केलेल्या ‘पद्मनाभानारायणा’ या अभंगाने रसिक मंत्रमुग्ध झाले होते. त्यांना तबला साथ निलेश रणदिवे यांनी केली. त्यानंतर यज्ञेश रायकर यांचे व्हायोलीन वादन सादर झाले. त्यांनी राग तिलोककमोदमध्ये विलंबित झपतालात पं. भीमसेन जोशी यांची ‘तिरथ को सब करे’ ही पारंपारिक बंदिश सादर केली. त्यानंतर मध्यलयात ‘कोयलिया बोले’ आणि स्वरचित बंदिश सादर केली. त्यांना तबला साथ पांडूरंग पवार यांनी केली.
महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा समारोप पं. श्रीनिवास जोशी यांच्या गायनाने झाला. त्यांनी विलंबित एक तालात ‘कानडा बोल’, दृत तालात ‘झनक झनक वा मोरे बिछुवा’ या बंदिशी गायल्या आणि ‘अगा वैकुंठीच्या राया’ ही भैरवी सादर केली. त्यांना संवादिनी साथ गंगाधर शिंदे आणि तबला साथ किशोर कोरडे यांनी केली.
महोत्सवात रविवारी यशस्वी सरपोतदार आणि पंडित अविराज तायडे यांचे गायन आणि डॉ. पूर्वा शहा यांच्या कथक नृत्य सादरीकरण होणार आहे.
