fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

चांगल्या समाजाच्या निर्मितीसाठी लोकसहभाग महत्वाचा – सुप्रिया सुळे

पुणे  : “चांगला समाज निर्माण होण्यासाठी आणि विकासकामांसह योग्य पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी लोकसहभाग अतिशय महत्वाचा असतो. कोणताही उपक्रम यशस्वी करण्यासाठी आपल्या प्रत्येकाचे योगदान गरजेचे असते,” असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. ‘सूर्यदत्त’ संस्थेतील प्रत्येक घटक समर्पित वृत्तीने काम करत असल्याचे पाहून आनंद वाटला, अशा शब्दात त्यांनी सूर्यदत्त परिवाराचे कौतुक केले.
सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने राजकीय व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल उत्कृष्ट संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांचा ‘सूर्यभूषण राष्ट्रीय पुरस्कार २०२२’ देऊन सन्मान करण्यात आला. सुप्रिया सुळे बावधन भागातील नागरिकांसाठीच्या ‘जनसंवाद’ कार्यक्रमासाठी ‘सूर्यदत्त’मध्ये आल्या होत्या. त्यावेळी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी सुळे यांच्या हस्ते सूर्यदत्त कॅम्पसमध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया, सहायक उपाध्यक्षा स्नेहल नवलाखा, सिद्धांत चोरडिया, संचालक प्रा. प्रशांत पितालिया, अधिष्ठाता प्रा. डॉ. प्रतीक्षा वाबळे, प्रा. अक्षित कुशल, राष्ट्रवादीचे कुणाल वेडेपाटील, किरण वेडेपाटील यांच्यासह इतर राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, सूर्यदत्तचे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “समाजबांधणीचे काम शालेय वयापासूनच व्हायला हवे. आपला परिसर, आपले शहर स्वच्छ, सुरक्षित राहील, यासाठी आपण सहभाग नोंदवला पाहिजे. मूल्यांची, संस्काराची जपणूक केली तर समाजाचे स्वास्थ्य चांगले राहते. नागरी समस्या सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही जबाबदार आहोतच; पण नागरिकांचा सहभाग देखील तितकाच महत्वाचा असतो.”
प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “सुप्रियाताईंचे राजकीय व सामाजिक कार्य प्रेरणादायी आहे. लोकप्रिय खासदार, संसदरत्न म्हणून त्यांची ओळख आहे. कोणताही निर्णय झटपट घेण्याचा आणि परखडपणे आपले मत मांडण्याचा त्यांचा स्वभाव आहे. समाजाचे प्रश्न सोडविण्यावर त्यांचा भर असतो. त्यांच्या कार्याबद्दल ‘सूर्यदत्त’तर्फे त्यांचा सन्मान करताना आनंद वाटत आहे.”
प्रशांत पितालिया यांनी सूत्रसंचालन केले. अभिषेक अवचार यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading